हडपसर -महाविकास आघाडी सरकारच्या काळात हडपसरमध्ये विकासकामे झाली नाहीत. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हडपसरमध्ये तब्बल 200 कोटींची विकासकामे केली जात आहेत. अनेक अंतर्गत रस्त्याचा विकास होत असून हडपसर परिसर वाहतूक कोंडीतून मुक्त होणार आहे, असे शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी सांगितले.
शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्या पुढाकारातून हांडेवाडी रोड श्रीराम चौक येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी भानिगरे बोलत होते. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष उल्हास तुपे, महिला शहर अध्यक्ष पूजा रावतेकर, माजी नगरसेविका उज्ज्वला जंगले, माजी नगरसेवक मारुती तुपे, विजया वाडकर, भूषण तुपे, सुभाष जंगले, अश्विनी सूर्यवंशी, शोभा लगड, अभिमन्यू भानगिरे, संतोष भानगिरे आदी उपस्थित होते.
यावेळी रामटेकडी इंडस्ट्रियल जोडणारा डीपी रस्ता, मंहमदवाडी डीपी रस्ता, पी.एस.स्कूल ते हांडेवाडीला जाणारा रस्ता, हडपसर मधील डीपी रस्ता, तरवडे वस्ती येथील कैलासवासी दत्तोबा उर्फ आप्पा शंकर दरोडे पाझर तलाव येथे संतसृष्टी उभारण्याचे काम, वाडकर मळा येथील महात्मा जोतिराव फुले जलतरण तलाव, महंमदवाडी व हडपसर भागातील सोसायट्यांना जोडणारे रस्ते व ड्रेनेज लाइनच्या कामाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व माजी आमदार योगेश टिळेकर यांनीही महाविकास आघाडी सरकार विरोधात भाषण केले.