माऊलींच्या पालखीचे चांदोबाचा लिंब येथे रंगले पहिले उभे रिंगण
प्रशांत ढावरे
लोणंद – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीने लावलेली शिस्तबद्ध उभी रांग.. माउलींच्या अश्वांनी घेतलेली दौड.. दिंडीतील वारकऱ्यांच्या पायांनी धरलेला ठेका.. टाळ-मृदंगांच्या गजरात रंगलेल्या फुगड्या अन् हरिनामाचा गजर करीत वारीच्या वाटेवरच्या पहिल्या उभ्या रिंगणाचा नेत्रदीपक सोहळा चांदोबाचा लिंब येथे मंगळवारी (दि. 20) उत्साहात पार पडला. हरी नामाच्या गजरात लाखो नेत्रांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.
मंगळवारी दुपारी महाआरती व नैवेद्य झाल्यावर माउलींचा पालखी सोहळा तरडगावकडे निघाला. खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश करताना सरदेचा ओढा येथे मान्यवरांच्या उपस्थित फलटण तालुक्याच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. पालखी मार्गावरील ऐतिहासिक चांदोबाचा लिंब याठिकाणी प्रथम पालखीचा मानाचा नगारखाना, माऊलींचा चांदीचा रथ पोहोचल्यावर सर्व दिंड्या आहे, त्या जागीच थांबविण्यात आल्या. वारकऱ्यांनी दोन्ही बाजूने उभे रहात रिंगणासाठी माऊलींचा जयघोष सुरू केला. “याची देही, याची डोळा’ रिंगण सोहळा पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता
चोपदारांनी उभे रिंगण करण्यासाठी जागा पाहणी केल्यावर पालखी सोहळ्यापुढे असणारे दोन अश्व ज्यात एकावर स्वत: माऊली स्वार असतात. तर दुसरा शितोळे सरकारांचा आळंदी संस्थानचा घोडा ज्यावर चोपदार हातात झेंडा घेऊन बसलेला असतो. चोपदारांनी दंड उंचावून इशारा दिल्यावर या दोन्ही अश्वांनी वेगाने दौड घेत रथापुढील 27 व रथामागील 20 दिंड्यांपर्यंत जाऊन पुन्हा ते माऊलींच्या रथापर्यंत आले. यावेळी त्यांना नैवैद्य भरविण्यात आला. पुन्हा अश्वांनी एकमेकांशी स्पर्धा करीत वारीतील पहिले उभे रिगणं पूर्ण केले. अश्वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी वारकरी आणि भाविकांची एकच गर्दी उसळली होती.
फुगड्या अणि फेर
परिसरात सुरू असलेला नामघोष आणि महिला-पुरुषांनीही बेभान होऊन घातलेल्या फुगड्या अणि फेर धरून येथे स्वर्ग सुखाचा सोहळाच सुरू केला होता. रिंगणाच्या जागेत सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या. रिंगण सोहळा आटपून विविध खेळ खेळून पुन्हा अलोट उत्साहाने न्हालेले वारकरी पुढील मुक्कामासाठी तरडगावच्या दिशेने मार्गस्थ झाले.