1 कोटी 80 लाखांची कामे सुरू असल्याची शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची माहिती
अकलूज (प्रतिनिधी) – अकलूज शहराच्या विकासासाठी विविध योजनेंतर्गत 1 कोटी 80 लाखांची कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. याशिवाय विविध कारणांसाठी अनेकवेळा विविध पक्षांकडून गाव बंद पुकारण्यात येतो, यासाबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अकलूज परिसरातील सर्व व्यापारी व गाळेधारकांची बैठक 4 फेब्रुवारीला आयोजित केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत ते बोलत होते. यावेळी उपसरपंच धनंजय देशमुख, किशोरसिंह माने-पाटील, ज्योतीदेवी माने-पाटील, संताराम सोनवणे, राहुल जगताप, आदित्य आर्वे, ग्रामविकास सुधीर मुंगूसकर व नागरिक उपस्थित होते.
यावेळी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूज परिसरातील झोपडपट्टया काढून 850 घरांचे पुनर्वसन केल्याबद्दल तसेच अकलूजमधील मंडई येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव दलित महासंघाचे राजू खिलारे यांनी मांडला त्यास सर्वांनुमते संमती देण्यात आली. तसेच माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या खासदार निधीतून विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडासंकुल येथे उभारण्यात आलेल्या ध्वज स्तंभाला तिरंगा झेंडा उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवपार्वती विकास सेवा ट्रस्ट व शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
प्रारंभी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामसभेची सुरुवात राष्ट्रगीताने झाल्यानंतर अकलूज परिसरातील मयत झालेल्यांना नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालक व विषय वाचन माणिक इंगोले यांनी केले. आभार राहुल जगताप यांनी मानले.