नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती : खबरदारी घेण्याचे आवाहन
पुणे – बदलत्या हवामानामुळे शहरासह राज्यात सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे अशा आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर मागील आठ दिवसांपासून चीनमधील “करोना’विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने अन्य देशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. या आजाराची लक्षणे काहीशी स्वाइन फ्लूप्रमाणेच असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. या विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या राज्यात होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले असून, खबरदारी म्हणून सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
सर्दी, खोकला (कॉमन कोल्ड) आणि श्वास घ्यायला किंवा त्या संबंधित कोणताही त्रास होणे. तसेच न्यूमोनिओ, पचनसंस्थेची लक्षणे, प्रतिकारशक्ती कमी होणे ही प्रमुख लक्षणे “करोना’ विषाणूची आहे. त्यामध्ये काही रुग्णांचे मूत्रपिंड निकामी होऊ शकते.
दरम्यान, यातील सर्दी, खोकला आणि श्वसन प्रक्रियेत अडथळा येणे, प्रतिकारशक्ती कमी होणे ही लक्षणे स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्येही दिसून येतात. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरत आहे. मुळात हा विषाणू देशात आला नसून, त्याला देशाबाहेर रोखण्यासाठी तयारी करण्यात आली आहे.