जयपुर – केंद्र सरकार पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे बांधकाम विषयक साहित्याची मागणी आगामी काळात वाढेल असे जेसीबी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक शेट्टी यांनी सांगितले.
लॉक डाऊन आणि निर्बंधामुळे खासगी क्षेत्रातून गुंतवणूक कमी झाली आहे. अशा अवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी प्रचंड गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील विविध क्षेत्रातील बांधकाम प्रकल्प वाढणार आहेत. त्यामुळे जेसीबीच्या उपकरणांना मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर अशीच परिस्थिती असल्यामुळे आमच्या उत्पादनांना जागतिक पातळीवर मागणी कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
या क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण व्हावा याकरिता जेसीबी इंडिया प्रयत्न करीत असून त्याचाच भाग म्हणून जयपूर येथील प्रकल्पांमध्ये मेक इन इंडियाच्या धरतीवर बांधकाम विषयक अवजड वाहनांची आणि उपकरणांची निर्मिती करण्यात येत आहे. अशा प्रकारची दहा उपकरणे जयपूर येथे सादर केल्यानंतर ते म्हणाले की, ही उपकरणे अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहेत.
त्यामुळे देशांतर्गत मागणीबरोबरच परदेशातूनही या उपकरणांना चांगली मागणी आहे. दुसऱ्या लाटेमुळे काही राज्यात थोडाफार परिणाम झाला असला तरी तो पहिल्या लाटेइतका गंभीर नाही. त्यामुळे आम्ही मागणी वाढेल अशी शक्यता गृहीत धरून उत्पादन वाढवित आहोत असे शेट्टी यांनी सांगितले. बांधकाम क्षेत्रातील उपकरणाच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून आमची कंपनी जगातील 100 देशांना उत्पादने निर्यात करीत आहे.