मोसूल (इराक) – उत्तर इराकमधील एका विवाह समारंभाच्यावेळी ( wedding) झालेल्या आतषबाजीमुळे लागलेल्या भीषण आगीत किमान 100 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या आगीमध्ये इमारतीच्या बांधकामाच्या साहित्यानेही पेट घेतल्यामुळे ही आग आणखीनच भडकली. त्यामुळे हे संपूर्ण सभागृह काही मिनिटातच जमीनदोस्त झाले. त्यामुळे अनेकांना घटनास्थळावरून सुटका करून घेता आली नाही.
उत्तर इराकमधील निनेवेह प्रांतातील हमदिया भागामध्ये ख्रिश्चन समुदायाच्या विवाह समारंभामध्ये ही दुर्घटना घडली. मोसूल शहरापासून 335 किलोमीटर अंतरावरील या भागामध्ये ख्रिश्चन समुदायाची संख्या लक्षणीय आहे.
मंगळवारी रात्री ही आग नक्की कशामुळे लागली याबाबत अधिकृतपणे कोणतेही स्पष्टिकरण देण्यात आलेले नाही. मात्र विवाह समारंभाच्या निमित्ताने पहिल्या मजल्यावरून आतषबाजी केली जात असल्याने ही आग लागल्याचे एका वृत्तवाहिनीच्या हिडीओमध्ये दिसते आहे.
या आगीमुळे संपूर्ण सभागृह जळून खाक झाले आहे. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. आगीमध्ये नवविवाहित दाम्पत्यालाही इजा झाल्याचे समजते आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा 114 इतका सांगितला आहे. मात्र त्याला सरकारी पातळीवरून समर्थन मिळू शकलेले नाही.
मृतांपैकी अनेकांचे मृतदेह ओळखण्यापलिकडे जळून गेले आहेत. पंतप्रधान मोहम्मेद शिया अल सुदानी यांनी या घटनेच्या कारणांचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जखमींना मदत आणि उपचाराच्या सुविधा पुरवण्याचे आदेश दिले आहेत.