नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील सुंदर नगर भागातील एका मंदिरातील प्रसाद खाल्ल्याचा आरोप करत जमावाने एका दिव्यांग व्यक्तीला जबर मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या त्या इसमाचा मृत्यू झाला आहे.
त्याला एका खांबाला बांधून जमावाने त्याला मारहाण केली आणि त्यातच तो मरण पावला. पोलिसांनी या घटनेतील काही जणांना ताब्यात घेतले आहे. देशाच्या राजधानीतच ही धक्कादायक घटना घडल्यामुळे माणुसकी संपुष्टात आली का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या घटनेचा एक व्हिडिओही आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात हा अत्यंत लाजीरवाणा आणि तेवढाच संतापजनक प्रकार निदर्शनास येतो आहे. जमाव त्या व्यक्तीला काठ्यांनी मारत असल्याचे सदर व्हिडिओत दिसून येते आहे.
त्याचीच दखल घेत सक्रिय झालेल्या पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात प्रचंड बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकारामागचा नेमका हेतू काय हेही जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो आहे.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार मोहम्मद इसर असे मरण पावलेल्या दिव्यांगाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी याच भागात एका हिंदू युवकाची हत्या झाली होती. हत्येच्या घटनेनंतर दिल्ली पोलीस आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शनेही करण्यात आली होती.
वातावरण फारच तणावाचे झाल्यानंतर दोन्ही समुदायातील काही ज्येष्ठ मंडळी स्वत: पुढे आली होती आणि त्यांनी शांततेचे आवाहन केले होते. त्यानंतर स्थिती पूर्वपदावर आली असल्याचे वाटत असतानाच ही ताजी घटना घडली आहे.
या प्रकारामुळे ज्यांना शांततेने जगायचे आहे आणि आपला व्यवसाय करायचा आहे अशा लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.