मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. दोन्ही गट नाव आणि चिन्हासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले होते मात्र न्यायालयाने याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा असे म्हटले होते. त्यानंतर कागदपत्रांच्या आधारे आयोगाने तात्पुरतं दोन्ही गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. यानंतर आता भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. यासाठी त्यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी,”नियतीने उद्धव ठाकरे चे बारा वाजवले, फुकट मिळालेल्या गोष्टींवर किती उडायचं याला पण मर्यादा आहेत. उद्धव ठाकरे ने आयुष्य फुकट बसून खाल्लं, त्याला वाटलं सगळं असंच राहणार पण हे कर्म आहेत उद्धव ठाकरे तुला याच जन्मात फेडावे लागणार आणि ही सुरुवात आहे अजून भरपूर तुला भोगावे लागणार.” असे म्हटले आहे.
नियतीने उद्धव ठाकरे चे बारा वाजवले, फुकट मिळालेल्या गोष्टींवर किती उडायचं याला पण मर्यादा आहेत. उद्धव ठाकरे ने आयुष्य फुकट बसून खाल्लं, त्याला वाटलं सगळं असंच राहणार पण हे कर्म आहेत उद्धव ठाकरे तुला याच जन्मात फेडावे लागणार आणि ही सुरुवात आहे अजून भरपूर तुला भोगावे लागणार.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 9, 2022
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आता राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक चिन्हाबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचं स्पष्ट केल्यानंतर आयोगाकडून नेमका कोणता निर्णय घेतला जाणार, यावरून चर्चा रंगली होती. शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत दोन्ही गटांकडून कागदपत्र आयोगापुढे सादर करण्यात आली होती. संध्याकाळी चार तास आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक झाल्यानंतर यासंदर्भातला निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे आगामी अंधेरी पोटनिवडणुकीत दोन्ही गटांना धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव वापरता येणार नाही.