चेन्नई – भारताचा ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळपटू पी. हरिकृष्णा याने सेंट लुईस ऑनलाइन जलद आणि अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत जलद प्रकारात बलाढ्य खेळाडू मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. मात्र, या कामगिरीनंतरही त्याला नंतरच्या चार फेऱ्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
हरिकृष्णाने जलद प्रकारात अखेरच्या तीन फेऱ्यांमध्ये विजयासह चांगली सुरुवात केली होती. त्याने अमेरिकेच्या जेफ्री झियॉंगचा पराभवही केला होता. त्यानंतर त्याने जगज्जेत्या कार्लसनलाही त्याने पराभूत करण्याची किमया साधली. मात्र, त्यानंतर त्याचा खेळ दर्जाला साजेसा झाला नाही व क्रमवारीत सहाव्या स्थानावर घसरण झाली. रॅपिड प्रकारात आता तो कशी कामगिरी करतो याकडे आता लक्ष राहणार आहे.