दुबई – करोनाचा धोका अद्याप जगभरात कायम असल्यामुळे यंदा अमिरातीत होत असलेल्या आयपीएल स्पर्धेसाठी काही नियम बदलण्यात आले आहेत. गेल्या मार्च महिन्यापासून ही स्पर्धा सुरू होणार होती. मात्र, त्याचवेळी करोनाचा धोका वाढल्यामुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकली गेली. त्यानंतर अमिराती क्रिकेट मंडळाने ही स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव बीसीसीआयला दिला होता तो मान्य करत यंदा ही स्पर्धा अमिरातीत सुरू झाली आहे. मात्र, करोनामुळे संपूर्ण क्रीडाक्षेत्रात बदल करावे लागले आहेत. या स्पर्धेसाठीही काही नियम जाहीर केले गेले आहेत.
असे आहेत नवे नियम…..
थुंकीच्या वापरावर बंदी – चेंडू स्विंग करण्यासाठी तसेच त्याची चकाकी कायम टिकवून ठेवण्यासाठी थुंकीचा वापर केला जातो. मात्र, आता करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी यावर बंदी लावण्यात आली आहे. तरीही हा प्रकार घडला तर पंच दोनवेळा तंबी देतील अन्यथा विरोधी संघाला पाच धावा अतिरिक्त मिळतील. सामन्यापूर्वी नाणेफेक झाल्यावर कर्णधारांना हस्तांदोलनही करता येणार नाही.
करोना राखीव खेळाडू – एखाद्या खेळाडूला करोना झाला तर त्याच्या बदली दुसऱ्या खेळाडूला संघात घेता येऊ शकेल.
नो बॉलचा निर्णय तिसरा पंच देणार – स्पर्धेत प्रथमच तिसरा पंच नो बॉलचा निर्णय देणार आहे.
स्पर्धेचा कालावधी लांबला – या वर्षी करोनामुळे आयपीएल स्पर्धेचा कालावधी 53 दिवस आहे. इतिहासात प्रथमच ही स्पर्धा जास्त दिवस चालणार आहे.
डबल हेडर – यंदाच्या स्पर्धेत सर्वात जास्त म्हणजे 10 दिवस डबल हेडर (रोज दोन सामने) सामने होणार आहेत.
सामन्याची वेळ – दरवर्षी 8 वाजता सुरू होणारा सामना यंदा 7ः30 वाजता, तर दुपारचा सामना 4 वाजता सुरू होईल.