ढाका – बांगलादेशात तीन हिंदू मंदिरांची विटंबना करण्यात आली आहे. या प्रकरणांमधील गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी हिंदूंनी केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भारताच्या सीमेजवळच्या लालमोनिरहाट जिल्ह्यात या घटना घडल्या असल्याचे स्थानिक प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.
लालमोनिरहाटमधील हातिबंधा उपजिल्ह्यातल्या गेंदूकुरी गावातल्या तिन्ही मंदिरांच्या प्रवेशद्वारावर पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये अभक्ष्य पदार्थ टांगून ठेवलेले आढळून आले होते. एका घराच्या दरवाज्यावर देखील अशीच पिशवी टांगून ठेवल्याचे उघड झाले होते. हा प्रकार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आला होता.
या प्रकरणी हातिबंदा पोलिसांकडे चार तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानंतर शनिवारी हिंदू समुदायाने श्री श्री राधा गोविंद मंदिरापाशी निदर्शने केली आणि या प्रकरणातील दोषींना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि दोषींना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासनही दिले आहे.