मेरठ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली.अंदाजे 700 कोटी रुपये खर्चून या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल, अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधांनी हे विद्यापीठ सुसज्ज असेल.
विद्यापीठात नेमबाजी, स्क्वॉश, जिम्नॅस्टिक्स, भारोत्तोलन, तिरंदाजी, कॅनोईंग आणि कयाकिंग इत्यादी सुविधाही उपलब्ध असतील.या विद्यापीठात 540 महिला आणि 540 पुरुष खेळाडूंसह 1080 खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची क्षमता असेल.
पूर्वी जिथे गुन्हेगार आणि माफियांचा खेळ चालत असे अशा उत्तर प्रदेश राज्यामधील सामाजिक परिस्थितीत बदल घडवून आणला आहे. आता मात्र, योगी सरकारने अशा गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण केला असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. या बदलामुळे मुलींमध्ये संपूर्ण देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
देशातील खेळांचा उत्कर्ष होण्यासाठी युवकांचा खेळावर विश्वास असायला हवा आणि खेळ हा व्यवसाय म्हणून स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. हा माझा संकल्प आहे आणि माझे स्वप्नही! आमच्या तरुणांनी इतर व्यवसायांप्रमाणे खेळाकडे पहावे अशी आपली इच्छा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सरकारने खेळांना रोजगाराशी जोडल्याची टिप्पणीही पंतप्रधानांनी केली.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात खेळांना प्राधान्य देण्यात आले आहे.
खेळांना आता विज्ञान, वाणिज्य किंवा इतर अभ्यासक्रमाच्या पंक्तीत ठेवण्यात आले आहे. यापूर्वी खेळांना अतिरिक्त अभ्यासक्रम म्हणून गणले जात होते, परंतु आता शाळांमध्ये खेळ हा नियमित विषय असेल, असे पंतप्रधान म्हणाले. क्रीडा, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा लेखन, क्रीडा मानसशास्त्र इत्यादींचा समावेश असलेली क्रीडा परिसंस्था नवीन संधी निर्माण करते. त्यामुळे खेळाकडे वाटचाल करणे हाच योग्य निर्णय असल्याचा विश्वास समाजात निर्माण होतो, असे ते पुढे म्हणाले.