ढाका – बांगलादेशाची करोना विरोधी स्वदेशी लस बंगाव्हॅक्सच्या मानवी चाचण्या करायला “बांगलादेश मेडिकल रिसर्च कौन्सिल’ने परवानगी दिली आहे. बांगलादेशातील औषध नियंत्रक महासंचालनालयातील गुणवत्ता आणि नियंत्रण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
ग्लोब बायोटेक या बांगलादेशातील औषध उत्पादन करणाऱ्या कंपनीने ही लस विकसित केली आहे. या लसीची चाचणी कशी घेतली जाणार आहे, याबद्दलची माहिती लवकरच “डिजीडिए’ला दिली जाणार आहे. या लसीच्या एका डोसनंतर या लसीच्या वैद्यकिय चाचण्यांना परवानगी दिली जाणार आहे. या मानवी चाचण्या ग्लोब बायोटेककडूनच घेतल्या जाणार आहेत, असे “डिजीडिए’च्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी सांगितले.
आपल्या लसीच्या उंदरांवर केलेल्या वापरानंतर वैद्यकीय पूर्व चाचणीदरम्यान पुरेसे समाधानकारक परिणाम बघायला मिळाले आहेत, असे ग्लोब बायोटेकने गेल्यावर्षी 5 ऑक्टोबरला सांगितले होते. या लसीचे नाव पूर्वी बॅंकोविड असे ठरवण्यात आले होते.