ढाका – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी आज देशातील सर्वात लांब पूलाचे उद्घाटन केले. पद्मा नदीवर उभारण्यात आलेला हा 6.15 किलोमीटर लांबीचा रेल्वे आणि रस्त्याचा चार पदरी पूर पूर्णपणे स्वदेशी निधीच्या आधारे उभारण्यात आला आहे. त्यामुळे हा पूल म्हणजे बांगलादेशची क्षमता, प्रतिष्ठा आणि अभिमानाचा विषय असल्याचे हसिना यांनी यावेळी बोलताना सांगितले.
हा पूल राजधानी ढाका आणि नैऋत्येकडील देशाच्या उर्वरित भागांना एकाचवेळी जोडू शकणार आहे. एकाच वेळी रेल्वे आणि रस्त्यांच्या वापराच्या या पूलासाठी बांगलादेश सरकारने सर्व खर्च स्वतःच केला आहे. या पूलाच्या बांधकामासाठी 3.6 अब्ज डॉलर खर्च आला आहे.
या पूलासाठीच्या सर्व खर्चाचा निधी बांगलादेश सरकारने स्वतः उभा केला असल्यामुळे आता 2026 साली संयुक्त राष्ट्राकडून जाहीर होणाऱ्या अल्प विकसितदेशांच्या यादीमधून बांगलादेशला वगळले जाण्याची शक्यता अधिक आहे. हे मोठे आर्थिक पाऊल बांगलादेश सरकार उचलू शकेल की नाही, याबाबत अनेक आर्थिक विश्लेषकांमध्ये मतभिन्नता व्यक्त केली जात होती.
या पूलाच्या बांधकामासाठी आगोदर जागतिक बॅंकेच्या गटाकडून अर्तसहाय्य दिले जाणार होते. मात्र बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्याच्या कारणामुळे 2012 मध्ये या गटाने या प्रकल्पातून माघार घेतली होती. बांगलादेशने भष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळले होते आणि या प्रकल्पासाठी स्वतःच निधी संकलन करण्याचा निर्णय घेतला होता.
पद्मा नदीवरील या पूलाच्या बांधकामासाठी अनेक तांत्रिक आव्हाने होती. त्या सर्वांवर मात करून या पूलाचे बांधकाम पूर्ण केल्यामुळे बांगलादेशसाठी हे एक आश्चर्य आहे. या भव्य प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी भारताने बांगलादेशचे अभिनंदन केले आहे.
122 मीटर खोल खांब…
पूलाचे खांब नेहमीच्या पूलांच्या खांबांपेक्षा खोलवर उभे करण्यात आले आहेत. हे खांब 122 मीटर खोल आहेत. तसेच त्यांच्या उभारणीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची तंत्रज्ञान प्रणाली वापरण्यात आली आहे. या पूलाला भूकंप रोधक प्रणालीची जोड देण्यात आली आहे, असे शेख हसिना यांनी म्हटले आहे. या प्रकल्पातून बांगलादेछ्या इंजिनिअरना मोठा नुभव मिळाला आहे. या अनुभवाच्या आधारे भविष्यात अशाच प्रकारच्या भव्य प्रकल्पांची उभारणी बांगलादेश स्वतः करू शकेल, असा विश्वासही शेख हसिना यांनी व्यक्त केला.