विधानसभेसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज

सूर्यकांत पाटणकर
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे नेतेमंडळी कुंपणावर

पाटण – पाटण तालुक्‍यात विधानसभा निवडणुकीसाठी देसाई-पाटणकर हे दोन्ही पारंपरिक गट सज्ज झाले आहेत. आमदार शंभूराज देसाई यांनी विकासकामांच्या माध्यमातून तालुक्‍यातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. तर पाच वर्षाच्या कालावधीत सत्यजितसिंह पाटणकर यांना सक्षम विरोधी गटाची भूमिका न बजावता आल्याने राष्ट्रवादी सध्या बॅकफूटवर आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेची युती न झाल्यास तालुक्‍यात देसाई-पाटणकर या दोन्ही गटांमध्ये काटे की टक्कर पहायला मिळणार आहे. दरम्यान, माजी खासदार छ. उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे तालुक्‍यातील नेतेमंडळी कुंपणावर असल्याने तालुक्‍यात राजकिय खळबळ होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

पाटण तालुका भौगोलिकदृष्ट्या अत्यंत अडचणीचा आहे. मात्र या तालुक्‍यात राजकीय वर्चस्व देसाई-पाटणकर या गटांचे राहिले आहे. त्यामुळे पक्षीय बोलबाला याठिकाणी बाजूला पडत असून गटातटाच्या राजकारणाला या ठिकाणी नेहमीच प्रोत्साहन मिळाले आहे. पाटण विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व लोकनेते बाळासाहेब देसाई व विक्रमसिंह पाटणकर यांनी खंबीरपणे केले आहे. त्यामुळेच पाटण तालुक्‍याचा विकासाचा पाया उभा राहिला आहे. याच नेत्यांचा वारसा जपण्याचे काम आमदार शंभूराज देसाई व सत्यजित पाटणकर करत आहेत.

पाटण मतदार संघात झालेल्या 2004 व 2014 च्या निवडणुकीत आमदार शंभूराज देसाई यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सत्यजित पाटणकर यांचा पराभव केला आहे. आमदार शंभूराज देसाई यांच्याकडे असणारी आमदारकी मिळवण्यासाठी पाटणकर गटाकडून संघर्ष केला जात आहे. 2014 साली झालेल्या निवडणुकीत या संघर्षाला यश आले नाही. आमदार शंभूराज देसाई यांनी सत्यजित पाटणकर यांचा तब्बल 18 हजार 824 मतांनी पराभव केला. आता पुन्हा 2019 विधानसभा निवडणुकीतही दोन्ही गटांचा संघर्ष पहावयास मिळणार आहे.

गेली पाच वर्ष आमदार म्हणून तालुक्‍याचे नेतृत्व करणाऱ्या शंभूराज देसाई यांनी विकासकामांच्या माध्यमातून पाटणकर गटाचा बालेकिल्ला असणाऱ्या पाटण व कोयना या विभागाला सुरुंग लावला आहे. विकासकामांच्या माध्यमातून परिवर्तन करण्याचे काम शंभूराज देसाई यांनी केले आहे. राज्यात युतीचे सरकार आहे, भाजप व सेनेत दाखल होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जिल्ह्याचे माजी खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. त्यामुळे सेना-भाजप युती झाल्यास आमदार देसाई यांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र या इन्कमिंगमुळे वातावरण निर्मिती झाली असून आमदार देसाई यांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

पाटणकर गटाचे खंदे समर्थक असणारे विक्रमबाबा पाटणकर यांनी गत जिल्हा परिषद निवडणुकीपासून फारकत घेतल्याने पाटणकरांच्या अडचणीत भर पडली आहे. तालुक्‍यात त्यांचे नेतृत्व म्हणणारा तरुणवर्ग मोठा आहे, याचा तोटा सत्यजित पाटणकर यांना होणार हे नक्की. कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी झाल्यास कॉंग्रेसचे हिंदूराव पाटील यांची साथ सत्यजित पाटणकर यांना मिळणार आहे. गत निवडणुकीत वेगवेगळे लढलेल्या कॉंग्रेसच्या हिंदूराव यांना सात हजाराहून जास्त मते मिळाली होती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत पाटण विधानसभा मतदार संघात समावेश झालेल्या तांबवे व सुपने गटांचा प्रभाव या निवडणुकीत कायम आहे. या दोन्ही गटात माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे वर्चस्व आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही मानणारा वर्ग या ठिकाणी आहे. मात्र जास्त प्रभाव काकांचा असल्याने या गटात ज्यांच्या डोक्‍यावर काकांचा हात तोच उमेदवार अपेक्षित मत घेतो हा इतिहास आहे. आमदार शंभूराज देसाई यांनी या विभागात केलेला विकास व काकांचा मिळणारा आशीर्वाद यामुळे या गटात देसाई वरचढ ठरणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार असणारे सत्यजित पाटणकर यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज असून जिल्हा परिषद पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे.

पाटण नगरपंचायत, तालुक्‍यातील ग्रामपंचायती, सोसायटी यावर पाटणकर गटाचे वर्चस्व असून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा मोलाचा सल्ला सत्यजित पाटणकर यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण तालुक्‍यातील जनतेमध्ये आजही त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांनी केलेला विकास, नवीन प्रकल्प, रोजगार निर्मिती, होऊ घातलेला साखर कारखाना या सकारात्मक बाबींचा फायदा सत्यजित पाटणकर यांना होणार आहे. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असूनही सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे शक्‍य न झाल्याने त्याचा तोटा या निवडणुकीत राष्ट्रवादीला होणार आहे. एकूणच 2019 ला होणाऱ्या निवडणुकीसाठी देसाई-पाटणकर हे दोन्ही गट सज्ज झाले आहेत.

 

गत निवडणुकीतील मते
मागील निवडणुकीत शंभूराज देसाई यांना 1 लाख चार हजार 419 मते मिळाली होती. सत्यजितसिंह पाटणकर यांना 85 हजार 595 मते मिळाली होती. कॉंग्रेसचे हिंदूराव पाटील यांना 7 हजार 630 मते मिळाली होती तर भाजपाचे दीपक महाडिक यांना 2096 मते मिळाली होती. तालुक्‍यात एकूण असणारे मतदान 2 लाख 96 हजार 251 आहे. त्यापैकी स्त्री मतदान 1 लाख 47 हजार 10 एवढे आहे. तर पुरुष मतदान 1 लाख 49 हजार 238 आहे.

राष्ट्रवादी नेते भाजपच्या उंबरठ्यावर

पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश मोरे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती संजय देसाई, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, सुजित पाटील ही राष्ट्रवादीची नेतेमंडळी सध्या भाजपाच्या कुंपणावर आहेत. ते कधीही पक्ष प्रवेश करू शकतात. त्यामुळे पाटणकर गटाला एकाकी झुंज द्यावी लागणार आहे.

कोणाला तोटा, कोणला फायदा

पाटण विधानसभा मतदार संघांता होऊ घातलेल्या निवडणुकीता भाजप-सेनेची युती न झाल्यास आमदार शंभूराज देसाई यांचा तोटा होणार असून भाजप-सेना वेगवेगळे लढल्यास पाटणकर गटाचा फायदा होणार आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत देसाई विरुध्द पाटणकर असाच संघर्ष तालुक्‍यातील जनतेला पहावयास
मिळणार आहे.

============
=========

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here