दिल्लीतील आमदार अलका लांबा अपात्र

नवी दिल्ली  -दिल्ली विधानसभेचे सभापती रामनिवास गोयल यांनी गुरूवारी आमदार म्हणून अलका लांबा यांना अपात्र ठरवले. त्यामुळे सत्तारूढ आम आदमी पक्षात (आप) बंडाचे निशाण फडकावल्याने अपात्र ठरवण्यात आलेल्या आमदारांची संख्या 5 वर पोहचली आहे.

दिल्लीतील चांदणी चौक विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अलका यांचे काही काळापासून आप नेतृत्वाशी बिनसले होते. त्यातून काही दिवसांपूर्वी अलका यांनी आपमधून बाहेर पडून स्वगृही (कॉंग्रेस) परतण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आपने दाखल केलेल्या याचिकेवरून गोयल यांनी अलका यांना पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींचा आधार घेत विधानसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवले.

आपमध्ये प्रवेश करण्याआधी त्या अनेक वर्षे कॉंग्रेसमध्ये सक्रिय होत्या. त्यांनी नुकतीच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या स्वगृही परतण्याविषयीच्या चर्चा आधीपासूनच सुरू झाल्या होत्या. पुढील वर्षी दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे.

अशातच आपलाही बंडखोरीने ग्रासल्याचे पाहावयास मिळत आहे. याआधी भाजपशी जवळीक साधल्यावरून आपच्या चार बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here