ममतांनी केंद्र सरकारविषयीची भूमिका केली मवाळ

मोदी, शहा यांच्या भेटीनंतर चर्चा

नवी दिल्ली  -पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे केंद्र सरकारविषयीची भूमिका ममतांनी मवाळ केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ममतांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमधील राजकीय संघर्ष शिगेला पोहचला असल्याचे चित्र पश्‍चिम बंगालमध्ये आहे. त्यातून ममता सातत्याने भाजप आणि त्या पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्र्यात दिसतात. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील प्रारंभीच्या दिवसांत ममतांनी तर असहकाराचीच भूमिका घेतल्याचे प्रकर्षाने दिसले.

पंतप्रधान म्हणून मोदी यांच्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्याला त्या अनुपस्थित राहिल्या. त्यानंतर निती आयोगाच्या बैठकीपासूनही त्या दूर राहिल्या. आता मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर ममतांनी त्यांची प्रथमच बुधवारी भेट घेतली.

त्यापाठोपाठ गुरूवारी त्यांनी शहा यांच्याशी चर्चा केली. त्या केंद्रीय गृहमंत्रिपदाची धुरा स्वीकारल्यानंतर शहा यांना पहिल्यांदाच भेटल्या. घटनात्मक कर्तव्य म्हणून त्या भेटीगाठी घेतल्याचे ममतांनी म्हटले आहे.

मात्र, मोदी आणि शहा यांच्या भेटीसाठी दिल्ली दौरा करून ममतांनी केंद्र सरकारविषयीची जहाल भूमिका मवाळ केल्याचाच प्रत्यय येत असल्याचे राजकीय विश्‍लेषकांना वाटत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.