मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत
पालखी सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान सज्ज
बाहेरून येणाऱ्या भाविक, वारकऱ्यांना प्रवेश बंद
देहूगाव – आषाढी वारीनिमित्त निघणाऱ्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 335 व्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान सज्ज झाले आहे. शुक्रवारी (दि. 12) दुपारी दोनच्या सुमारास मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पालखीचे प्रस्थान होणार आहे. तत्पुर्वी श्री संत तुकाराम महाराज मंदिर व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. मंदिरात परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येणार नसून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रस्थान सोहळ्यासाठी देहूगावात भाविक व वारकऱ्यांना सोडण्यात येणार नाही. त्यासाठी गुरुवारपासून गावाच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. शुक्रवारी पहाटे चारला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काकडारती व अभिषेक महापूजा संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे व विश्वस्तांच्या उपस्थितीत होईल. साडेचार वाजता श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा होईल.
वैंकुठगमन मंदिरातील महापूजा पाच वाजता संस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते होणार आहे. सकाळी सहाला पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीची पुजा होईल. नऊ वाजता सेवेकरी मसलेकर हे श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन भजनी मंडपात आणतील. सकाळी दहाला श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या किर्तनाने होणार आहे.
काल्याच्या किर्तनांनतर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भेट होईल. त्यानंतर किर्तन मंडपात प्रस्थानाच्या ठिकाणी पादुका आणल्या जातील. दुपारी दोनला प्रस्थान सोहळ्याला सुरवात होईल. संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांच्या हस्ते विधिवत परंपरेप्रमाणे प्रस्थान होणार असल्याची माहिती सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी दिली.
प्रस्थान झाल्यानंतर पादुका पालखीमध्ये ठेवून मंदिराला प्रदक्षिणा होईल. यानंतर पालखी किर्तन मंडपात ठेवून सायंकाळी सहाला समाज आरती, कीर्तन, जागर होईल. शुक्रवारी वारकऱ्यांनी, ग्रामस्थांनी गर्दी करू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावला आहे.
मंदिर, परिसराचे निर्जंतुकीकरण
मंदिर व परिसरात 10 लीटर सोडीयम हायपोक्लोराईड व व्हिरेक्स या रसायनाने निर्जंतुकीकरण करण्यात आले. पिंपरी येथील “क्रिएटिव्ह’ संस्थेतर्फे विजय बोत्रे यांनी त्यासाठी सहकार्य केले.