कराड – शाळा सुरू झाल्याबरोबर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीकोरी पुस्तके देण्याचा प्रतिवर्षीचा पायंडा यावर्षीही जपला जावा यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून केंद्रनिहाय पुस्तकांच्या वितरणास बुधवारपासून प्रारंभ करण्यात आला. शाळा सुरू होण्याबाबत अजून अनिश्चितता असली तरीही ज्या दिवशी शाळा सुरू होतील. त्याच दिवशी शाळेत मुलांना पुस्तके दिली जाणार आहेत.
कराड तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व अनुदानित शाळांमधील मुलांसाठी सुमारे 47 हजार पुस्तके उपलब्ध झाली आहेत. मराठी मिडीयम, सेमी व उर्दू माध्यमाची पुस्तके आहेत. कराड येथील एच. के. डी. अँग्लो उर्दू हायस्कूल येथून तालुक्यातील 25 केंद्रांमधील केंद्रप्रमुखांना वितरित करण्यात येत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स रहावा व गर्दी टाळता यावी यासाठी रोज दोन बीट असे आठ बिटासाठी चार दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे.
पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानुसार तालुक्यातील शाळांसाठी 47 हजार पुस्तकांची उपलब्धता झाली आहे. पंचायत समिती सभापती प्रणव ताटे यांच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी शबाना मुजावर, शिक्षण विस्ताराधिकारी जमिला मुलाणी, केशव चौगुले, शकुंतला देवकांत, मुख्याध्यापक रियाज इरकल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
पुस्तक वितरण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गटसाधन केंद्रातील कर्मचारी तसेच माध्यमिक शाळांमधील शिपाई परिश्रम घेत आहेत. तालुक्यातील 25 केंद्रांच्या माध्यमातून ही पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील सर्व अनुदानित शाळांमध्ये पोहोचणार आहेत.
करोनामुळे मुळातच शाळा सुरू होण्यास विलंब होणार आहेत. जेंव्हा मुले शाळेत येतील तेंव्हा पुस्तके नसल्याने त्यांचे नुकसान आणखी नुकसान होऊ शकते. यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या पुस्तकांचे बीटनिहाय वाटप करण्यात आले आहे. प्राथमिक स्तरावर ही पुस्तके केंद्रस्तरावर देण्यात येत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक शाळेत देण्यात येतील.
शबाना मुजावर, गटशिक्षणाधिकारी