लोणी धामणी, (वार्ताहर) – धामणी (ता. आंबेगांव) येथील पुरातन राम मंदिरात रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करुन पंचक्रोशीतील भाविकांच्या व ग्रामस्थाच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा भक्तिमय व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
सोळाव्या शतकात संतश्रेष्ठ जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या हस्ते येथील श्रीराम,लक्ष्मण व सितामाई यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली असल्यामुळे येथील श्रीराम मंदिरात रामजन्म सोहळ्यासाठी वारकरी सांप्रदाय व वारकर्यांची व पंचक्रोशीतील भाविकांची व ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.
पहाटे देवस्थानाचे मुख्य पुजारी मधुकर महाराज क्षिरसागर व मुकुंद क्षिरसागर यांच्या हस्ते पंचामृताने श्रीराम लक्ष्मण सितामाईच्या मूर्तींना अभिषेक करण्यात आला. त्यानंतर या सर्वागसुंदर देखण्या मूर्तीना वस्रालंकार घालण्यात आले. श्रीरामाच्या दर्शनासाठी पहाडदरा,शिरदाळे.जारकरवाडी, खडकवाडी येथील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी दहा वाजता परमेश्वर महाराज पांचाळ आळंदीकर यांचे रामजन्माचे कीर्तन झाले.
कीर्तनाला साथ देण्यासाठी आळंदी येथील ज्ञानेश संजीवन वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख गणेश महाराज गंलाडे व त्यांच्या संस्थेतील वारकरी सामील झालेले होते. संस्थेतील बालवारकर्याच्या उपस्थितीने रामजन्माच्या कीर्तनाला रंगत आली. मंदिरात व देवाच्या पाळण्याभोवती फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रामजन्माच्या वेळी देवाच्या पाळण्यावर महिला भाविकांनी भुईमुगाच्या शेंगा.रेवड्या.खारका उधळल्या.
दुपारी बारा वाजता मुकुंद क्षिरसागर व बाळासाहेब बेरी यांनी श्रीरामाची पंचधातूची मूर्ती पाळण्यात ठेवली. त्यानंतर सरपंच रेश्मा बोर्हाडे व गूणवंती क्षिरसागर यांच्या महिला भाविकांनी “राम जन्मला गं सखे राम जन्मला हा रामजन्माचा पाळणागीत म्हणण्यात येऊन यंदाचा रामजन्माचा सोहळा उत्साहात व आनंदात पार पडला.
यावेळी मंजुश्री क्षिरसागर,प्रिया क्षिरसागर,मोहीनी क्षिरसागर, विद्या रायरीकर, जयश्री पुरंदरे, शुंभागी कुलकर्णी, चैतन्य पुरंदरे,आदीनाथ जाधव, पांडुरंग बोर्हाडे, मच्छिंद्र वाघ, अजित बोर्हाडे, सागर जाधव, अक्षय विधाटे, गुंडाजी भुमकर,प्रमोद देखणे,
दिलीप आळेकर, सुनील सासवडे,खंडूमामा बोत्रे, दत्ता बोर्हाडे, स्वप्निल शिंदे, माऊली कडूसकर,विठ्ठल रायरीकर,कांता रायरीकर,लक्ष्मण रोडे,रमेश जाधव, वामन जाधव, वसंत जाधव, अरुण विधाटे, बाळासाहेब भुमकर गुरुजी, देवराम गवंडी, ज्ञानेश्वर बोर्हाडे, सूर्यकांत जाधव व देवस्थानाचे सेवेकरी क्षिरसागर कुटुंबिय उपस्थित होते.