‘शिवशाही’मध्ये जाणाऱ्या 20 जणांची यादी जाहीर
आळंदी (प्रतिनिधी) – माउलींच्या पादुका मंगळवारी (दि. 30) शिवशाहीने पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहेत. यावेळी पंढरीकडे जाणाऱ्या 20 जणांची यादी आळंदी देवसंस्थानने जाहीर केली आहे. माउलींच्या पादुकांना मंगळवारी पवमान पूजा झाल्यानंतर दुपारी 12 वाजता नैवेद्य दाखवला जाणार आहे. त्यानंतर एक वाजता माउलींच्या पादुका पंढरीकडे मार्गस्थ करण्याची तयारी पूर्ण केली जाईल. तसेच शिवशाहीचे सॅनिटायझेशन केले जाणार आहे. तर वारीसाठी जाणाऱ्या 20 जणांची करोना चाचणी झाली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
प्रवासाआधी वारकऱ्यांना फेस शील्ड, मास्क दिले जाणार आहे. आजोळ घरातील पादुका दुपारी एक वाजता पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्या हातात दिल्या जातील, यावेळी त्यांच्यासमवेत ऊर्जितसिंह शितोळे सरकार आणि पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई सोबत असतील. वाखरीत गेल्यानंतर क्रमवारीनुसार संतांच्या पादुकांना पंढरीत प्रवेश दिला जाणार आहे. पंढरपूरला जाण्यासाठी माउलींच्या पादुकांसोबत स्वतंत्र पोलीस बंदोबस्त असणार आहे.
हे आहेत 20 मानकरी….
पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील, सोहळा मालक राजेंद्र आंधळकर, उर्जितसिंह शितोळे सरकार, बाळासाहेब चोपदार, रथापुढील दिंडी क्रमांक एकमधील ऋषिकेश वागस्कर, संभाजी बराटे, ज्ञानेश्वर दिघे, संजय कोलन, दिंडी क्रमांक दोनमधील अविनाश भोगाडे, दिंडी क्रमांक तीनमधील ऋषिकेश मोरे, रथामागे दिंडी क्रमांक एकमधील चंद्रकांत तांबेकर, खडकतकर, क्रमांक दोनचे श्रीकांत टेंभूकर, क्रमांक तीनचे भानुदास टेंभूरकर, दोन आळंदीकर मानकरी, एक पुजारी, एक करणेकरी, एक शिपाई.
पोलिसांचा कडक बंदोबस्त…
माउलींच्या पादुकांचे मंगळवारी पंढरीकडे प्रस्थान होणार असल्याने भाविक गर्दी करण्याची शक्यता असल्याने आळंदी शहरात कडक ठेवण्यात येणार आहे. माउली समाधी मंदिराचे चारही बाजूचे सर्व दरवाजे बंद ठेवण्यात येणार आहे. देऊळवाडा, आजोळ घर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येईल. देऊळवाडा आणि आजोळ घराकडे येण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले, तर मंदिराकडे जाणारे येणारे सर्व रस्ते बॅरिकेट्स लावून बंद करण्यात येणार आहेत.