४० पेक्षा जास्त रुग्ण तापाने फणफणले : ग्रामपंचायत प्रशासन मात्र उदासीन
शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दोन महिन्यांपासून डेग्यूसदृश्य आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व आशा महिला कर्मचाऱ्यांनी गावामध्ये पाहणी केली. धुरफवारणीबाबत ग्रामपंचायत उदासीन असल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले.
कोरेगाव भीमा, सणसवाडी, वढु बुद्रुक याठिकाणी डेग्यूसदृश्य आजारात वाढ झाली आहे. कोरेगाव भीमा परिसरात महिनाभरात 40 पेक्षा जास्त रुग्ण असून सणसवाडीमध्येही मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी उपाययोजना करत नाहीत. आनंदनगर, नरेंद्रनगर, दत्तनगर, खैरमोडेनगर, आनंद पार्क परिसरासह उत्तर बाजुकडील बहुतांश लोकवस्त्यांमध्ये महिनाभरापासून पावसाचे पाणी साचले आहे. याठिकाणी डासांमध्ये वाढ झाली असण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र उदासीन आहे. तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पर्यवेक्षक जे. जी. मारणे, आरोग्य सेवक एस. जी. थिटे, एस. एस. चोपडा, आर. एस. चांदणे, आशा स्वयंसेविका अश्विनी फडतरे, अमृता गव्हाणे, सुनिता पाटील, मंगल खरात, सोनाली राऊत आदींनी कोरेगाव भीमा येथील रुग्णालय, रक्त तपासणी केंद्रातून रुग्णांची माहिती घेत त्या रुग्णांच्या रहिवासाच्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी कोरेगाव भीमा परिसरात नागरिकांच्या पाण्याच्या टाक्या, बॅरल, फ्रीजमध्ये मच्छरच्या अळ्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत. आरोग्य पर्यवेक्षक जे. जी. मारणे यांनी महिलांमध्ये प्रबोधन केले.
ग्रामपंचायतच्या सात फॉगिंग मशिनपैकी सहा मशिन नादुरुस्त झाल्या आहेत. त्या मशीन दुरुस्तीला टाकण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी बाहेरून फवारणी यंत्र मागविले आहेत.
– राजेंद्र सात्रस, ग्रामविकास अधिकारी, कोरेगाव भीमा.