परतीचा अतिपाऊस शेतकऱ्यांचे करतोय नुकसान

पेमदरा आणि परिसरात कांदा पिकांसह इतर पिकांचेही नुकसान

अणे – जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात असणाऱ्या पेमदरा (ता.जुन्नर) येथे गेल्या तीन ते चार वर्षांपासून भीषण दुष्काळ होता. या वर्षी या भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे; पण हा परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

पेमदरा (ता. जुन्नर) येथील परिसरात काढायला आलेल्या कांद्याच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने कांदा असाच शेतकऱ्यांना सोडून द्यावा लागत आहे. ज्वारीच्या पिकांमध्येसुद्धा पाणी भरल्यामुळे ज्वारीच्या पिकाचे नुकसान होत आहे.

या भागांतील शेतकरी गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळ आणि आता यावर्षी पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या आधी शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळाची कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच आता डोळ्यासमोर पिकाचे नुकसान होताना पाहून तोंडावर आलेली दिवाळी कशी साजरी करावी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. दुष्काळातून सावरल्यानंतर हा ओला दुष्काळ आता शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणत आहे.

गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन पिकाची पाहणी करण्याची विनंती केली आहे. पेमदरा व परिसरातील शेतकरी पावसामुळे चिंतातुर आहेत. मुक्ताजी दाते, बाळासाहेब दाते, सुनील बेलकर, गवराम दाते भाऊसाहेब दाते, शांताराम दाते, सभाजी दाते, लक्ष्मण दाते, पांडुरंग दाते आधी शेतकरी नुकसानग्रस्त झाले आहेत.

2015-16 पासून सरकारची अद्याप कोणतीही मदत गावाला मिळालेली नाही. पन्नास पैशाच्या आत आणेवारी असली तरी अद्याप कोणतीही शासकीय मदत नाही. 2018-19 मध्ये भीषण दुष्काळ होता. शेतकऱ्यांना पीक विमा भरला; पण आमचे नुकसान झाले. यावर्षी अगदी उशिरा मे महिन्यात गावांमध्ये चारा छावणी सुरू झाली. पीक विमा पठार भागावरील एकाही शेतकऱ्याला मिळालेला नाही.
– बाळासाहेब दाते, शेतकरी, पेमदरा

शेतामधील वटाणा, सोयाबीन, कांदा पीक पाण्याखाली गेले आहे. चार ते साडेचार एकर कांदा पूर्ण वाया गेला आहे. पाच लाखांचे नुकसान पावसामुळे झाले आहे. वाटाण्याला शेतातच मोड आले आहेत. सोयाबीनचे पीक पूर्ण वाया गेले आहे.
– गेवराम दाते, शेतकरी, पेमदरा

शेतामध्ये काढणीला आलेला कांदा आहे. त्या कांद्यामध्ये पूर्ण पावसाचे पाणी साचल्यामुळे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
– सुनील बेलकर, शेतकरी, पेमदरा

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.