पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
बारामती – अवैध सावकारीने बारामतीत यापूर्वी तीन बळी घेतले असताना ऐन दिवाळीत सावकारांच्या जाचाला कंटाळून झहीर समद बागवान (वय 35, रा. निलम पॅलेससमोर, फलटण रस्ता, बारामती) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाचजणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
याबाबत झहीर यांची पत्नी लतिफा बागवान यांनी फिर्याद दाखल केली. आकाश देवकाते उर्फ गोट्या, जगताप आबा, रुपा खंडाळे उर्फ पोटे, विकास व बापू वाघमारे (दोघांचे पूर्ण नाव, पत्ते नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बचत गट व व्याजाचे पैसे देण्याच्या कारणावरून आरोपींनी वेळोवेळी मानसिक त्रास देत व्याजाच्या पैशांची मागणी केली. या त्रासाला कंटाळून झहीर यांनी शुक्रवारी (दि. 25) राहत्या घरात स्लॅबच्या सिलिंगच्या हुकाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी अद्याप फरार आहेत.
या प्रकरणी सावकारी कायद्यानुसारही गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते; परंतु शहर पोलिसांनी पाच जणांवर केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सावकारीचे कलम लावण्यात आले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
अवैध सावकारीचा चौथा बळी –
बारामतीत अवैध सावकारीतून यापूर्वी तिघांनी आपले जीवन संपवले आहे. झहीर बागवान यांचा चौथा बळी सावकारीने घेतला. बारामतीत अवैध सावकारीची पाळेमुळे घट्ट रोवली गेली आहेत. पोलिसांना सावकारांचा बंदोबस्त करण्यात अपयश आले आहे. किंबहुना कठोर कारवाई होत नसल्याने सावकारांचे फावले असल्याची परिस्थिती बारामतीत पाहायला मिळत आहे.