व्हिएन्ना, (ऑस्ट्रीया) – व्हिएन्नामधील पाक दूतावासासमोर अफगाणी समुदायाने पाकिस्तानविरोधात जोरदार निदर्शने केली आहेत. व्हिएन्नामधील अफगाण कल्चरल असोसिएशन आणि पश्तुन तहफूज मुव्हमेंटच्यावतीने ही निदर्शने करण्यात आली होती.
पश्तुन तहफूज मुव्हमेंटचे अध्यक्ष आणि सहसंस्थापक मन्झूर अहमद पश्तुन यांची बेकायदेशीर अटक आणि पाकिस्तानमधून अफगाणी नागरिकांना हुसकावून लावले जाण्याचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने केली गेली.
पाक दूतावासासमोरील या निदर्शनांमध्ये २५ अफगाणी सहभागी झाले होते. पाकिस्तानमध्ये पश्तुन समुदायाला कोणताही न्याय मिळत नाही. अफगाणी वंशियांवर आयएसआय आणि पाक लष्कर मिळून अत्याचार करत असल्याचा आरोप देखील काही निदर्शकांनी यावेळी केला.
अशीच निदर्शने पूर्वी पाकिस्तानमध्येही केली गेली होती. जगभरातील पश्तुन तहफूज मुव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी केवळ पाकिस्तानमध्येच नव्हे, तर अमेरिका, बेल्जियम, नेदरलँड्स आणि ऑस्ट्रियासह जगभरातील प्रमुख शहरांमध्ये निदर्शनांचे आयोजन केले आहे.