आ. कोल्हेकडून साठवण तलावाची पाहणी

रांजणगाव देशमुखला टॅंकरच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी
पाणी काटकसरीने साठवण वापरण्याचा सूचना : टंचाई आढावा बैठकीत ग्रामस्थानी मांडल्या समस्या

कोपरगाव –
सध्या दुष्काळाचा चटका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे रांजणगाव देशमुख व सहा गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या धोंडेवाडी साठवण तलावातील पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे. तसेच रांजणगाव देशमुख गावासाठी टॅंकरच्या दोन ऐवजी पाच खेपा करून, त्याचा उद्‌भव बदलून द्यावा, अशा सूचना आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे व प्रभारी गटविकास अधिकारी पी. डी. वाघिरे यांना दिल्या.

आमदार कोल्हे यांनी अचानक धोंडेवाडी साठवण तलावास भेट देऊन पाहणी केली. तसेच टंचाई आढावा बैठक घेतली. विजेच्या थकबाकीमुळे खंडित केलेला या योजनेचा वीजपुरवठा थेट ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. गोदावरी कालव्यांच्या चालू पाटपाणी आर्वतनांत या साठवण तलावात पाणी घेतले. तो पूर्ण क्षमतेने भरण्यांबाबत आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या, असेही आ. कोल्हे यावेळी म्हणाल्या.
यावेळी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष संजय होन, साईनाथ रोहमारे, संचालक अशोक औताडे, माजी उपसभापती नानासाहेब गव्हाणे, विक्रम पाचोरे, बाबासाहेब गोर्डे, निवृत्ती गोर्डे, विलास डांगे, सुखदेव खालकर, गजानन मते, ज्ञानदेव चव्हाण आदी उपस्थित होते. प्रारंभी माजी सरपंच कैलास रावण रहाणे यांनी प्रास्ताविक करून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे.

जवाहर विहीर योजनेत 80 प्रस्ताव तयार आहेत. मात्र शासन अटीमुळे त्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या दूर कराव्यात अशी मागणी केली. रांजणगाव देशमुखसह दहा गावांत 7 हजार 610 पशुधन असून, त्यांच्या चाऱ्यासाठी या परिसरात छावणी सुरू करावी, तसेच पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरच्या खेपा अवघ्या दोनच होतात. त्यामुळे जनावरांच्या पिण्याचे पाण्याचे हाल होत आहेत. तेंव्हा टॅंकरखेपा वाढवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर तहसीलदार योगेश चंद्रे यांनी छावणी ऐवजी दोन दिवसांत सर्वेक्षण करून चारा डेपो सुरू करण्याबाबत नियोजन करू. वडझरी ते रांजणगाव देशमुख हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करावेत.

डाळिंब पीकविमा, दुष्काळी अनुदान, सोयाबीन पीकविमा तत्काळ मिळावा, अशा शेतकऱ्यांनी मागण्या केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विहीर योजनेतील पैसे दोन वर्षांपासून मिळत नाही, ते मिळावे, अशी लाभधारकांनी मागणी केली. आमदार कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत त्याच्या निरसनासाठी प्रयत्न करू असे सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)