दूरदृष्टी अन्‌ अचूक दिशा बदलल्याने डॉ. विखे खासदार

अनिल देशपांडे
राहुरी  – बदलत्या राजकीय वातावरणाचा अचूक अंदाज घेणे, राजकीय वाटचालीत अंत्यत महत्वाचे समजले जाते. अशा बदलाचा अचूक अंदाज घेवून धोरणात्मक लवचिकता ठेवून तत्परतेने निर्णय घेणे महत्वाचेच नव्हे तर दशा बदलणारे ठरते. दिशा बदलल्याने दशा बदलल्याचे अनेकदा दिसते. डॉ. सुजय विखे खासदार होण्यात त्यांच्या तीन वर्षांच्या जय्यत तयारी पेक्षाही काकणभर नव्हे तर सिंहाचा वाटा या दिशा बदलणाऱ्या निर्णयाचा असल्याचे स्पष्ट होते आहे. असा अचूक अंदाज घेण्याची जी दूरदृष्टी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडे होती. त्यांचाच मी नातू आहे, हे डॉ. सुजय विखेंनी मिळविलेले खासदारपद दर्शवित आहे.

इंडिया शायनिंग जाहीरातीचे वेळी माध्यमातील वातावरण परत एकदा अटलबिहारी वाजपेयी यांच्या अर्थातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येईल असेच चित्र होते. मात्र वास्तवता तशी नव्हती. वाजपेयीच्या मंत्रीमंडळात बाळासाहेब विखे पाटील अवजड उद्योगमंत्री होते. देशभरातून अनेक छोटे मोठे नेते भाजपत येत होते. देशभरात फक्त दोनच नेत्यांनी भाजप शिवसेना यांच्यापासून फारकत घेतली. त्यात दिग्गज नेते स्व.बाळासाहेब विखेंचा समावेश होता. सकृतदर्शनी हा निर्णय एकदम चुकीचा ठरेल असेच वाटत होते. युपीए सरकारच्या बुडत्या जहाजात विखे पाटील बसले असल्याची प्रतिक्रिया ही या निर्णयावर व्यक्त झाली होती. पण निवडणूक निकालाने हा निर्णय देशभरातील बदलत्या राजकीय वातावरणाचा अचूक अंदाज घेणारा ठरला. त्यांच्या या निर्णयातून त्यांची राजकीय दूरदृष्टीवरच जोरदार शिक्कामोर्तब झाले. तशाच दूरदृष्टीचा प्रत्यय डॉ. सुजय विखेंच्या बाबतीत येत आहे.

तीन वर्षांपासून डॉ. सुजय विखेंची लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु होती. भाजपची उमेदवारी हा तर विषयच नव्हता. कॉंग्रेस पक्षातील सर्व वजन वापरुन जागा आघाडीत बदलून घेवू असा त्यांचा प्रयत्न होता. नाहीच जमले तर अपक्ष अशीच त्यांची दिशा होती. बालाकोट हल्ल्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोंदींची देशभरात लोकप्रियता पन्नास टक्के होती. अन्य राजकीय नेत्यांच्या तुलनेत ती सर्वाधिक तर होतीच पण अन्य राजकीय नेते लोकप्रियतेत खूपच मागे होते. बालाकोट हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून सर्जिकल स्ट्राईक झाला आणि लोकसभा निवडणूक रंगच बदलला. हा सर्जिकल स्ट्राईक केवळ पाकिस्तान व दहशतवादी यांनाच नव्हता. तर त्यातील राजकीय परिणामकारकतेचा विचार करता तो देशभरातील सर्वच राजकीय विरोधी पक्षांना देखील बसला. नरेंद्र मोदींची लोकप्रियतेत तब्बल22 टक्‍केची वाढ होवून ती 72 टक्के झाली. या बदललेल्या राजकीय वातावरणाचा अचूक अंदाज डॉ. सुजय विखेंनी घेतला. त्यांच्या सुदैवाने त्यांचे विरोधक त्यांना आघाडीची उमेदवारी मिळणार नाही. यासाठी प्रयत्न करत होतेच. या प्रयत्नांनी डॉ.सुजय विखेंनी दिशा बदलण्याचा अचूक निर्णय घ्यावा लागला.

विखे सारख्या मात्तब्बर घराण्यास तेही भाजपत प्रवेश देवून कॉंग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा राजकीय सूज्ञपणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविला. नगरच्या प्रचारसभेत खासदार दिलीप गांधींची समजून काढताना फडणवीसांनी तसे बोलून ही दाखवले. केवल नगरची उमेदवारी एवढाच हे स्ट्राईक नव्हते तर राज्यातील कॉंग्रेसला संभाव्य खिंडार पाडण्याची संधी घेण्याचा हा विषय होता.जाणता राजांनी ही संधी गमावली. ती फडणवीसांनी घेतली. डॉ. सुजय विखेंनी दिशा बदलत भाजपत येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची तीन वर्षांची सर्वंकष तयारी आणि इच्छा फलद्रूप झाली. त्यांना आम्ही राष्ट्रवादीची उमेदवारी देत होतो. त्यांनीच ती घेतली नाही अशी कबुली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अचूक अंदाज घेवून दिशा बदलली नसती तर तीन वर्षांची सर्वंकष जय्यत तयारी कामास आलीच असती का हा प्रश्‍नच आहे. या तयारीने त्यांचे मताधिक्‍यात वाढ झाली.

त्यांचा विजय सुकर झाला हे खरेच आहे. मात्र दिशा बदलल्यानेच हा विजय सुकर झाला. तब्बल दोन दशकानंतर खासदारकी विखे कुटूंबात आली आहे. स्व.बाळासाहेब विखेंचे दिल्लीतील वारसदार डॉ. सुजय विखे ठरले आहेत. नातवाचा हट्ट बारामतीच्या आजोबांनी पुरवला नाही. मात्र आपला दिल्लीतील पंचवीस वर्षांचा वारसा चालविण्याची संधी नातू डॉ. सुजय विखेंना मिळाली आहे. आजोबा सारखाच दिशा बदलण्याच्या निर्णयाचा या संधीत सिंहाचा वाटा आहे हे मान्य करावेच लागेल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.