रोहित पवार करिष्मा दाखविणार का?

लोकसभा निवडणुकीत भाजपचे मताधिक्‍य घटल्याने पालकमंत्री राम शिंदे यांना धोक्‍याची घंटा
ओंकार दळवी
जामखेड – लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा करिष्मा देशभर चालला. त्यामुळे हा करिष्मा विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा सर्वत्र चालला असला, तरी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे मताधिक्‍य घटल्याचे समोर आले आहे. त्यातच पुणे जि. प.चे सदस्य रोहित पवार हे विधानसभेच्या तयारीसाठी तालुक्‍यात संपर्क वाढवत आहेत. त्यामुळे भाजपचे घटलेले मताधिक्‍य पालकमंत्री राम शिंदे यांच्यासाठी धोक्‍याची घंटा ठरू शकते. त्यामुळे पवार विधानसभा निवडणुकीत करिष्मा दाखवतील का, याचीच चर्चा सध्या येथे सुरू आहे.

खा. डॉ. सुजय विखे यांच्या मागे पालकमंत्री राम शिंदे यांचे खंबीर नेतृत्व असल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणली असल्याचे सर्वश्रुत आहे. तरी ही कर्जत-जामखेड मतदारसंघातून भाजपचे मताधिक्‍य घटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री राम शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत सत्वपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे, हे उघड झाले आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा धुव्वा उडालेला असतानाच लोकसभा जाहीर होण्याआगोदर पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची एकत्र मोट बांधण्याचे काम केले. या भागातील दुष्काळी परिस्थिती जाणून घेऊन नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय केली. पिण्याच्या पाण्यासाठी 60 टॅंकर सुरू केले आहेत. यामधून 87 गावांना दररोज 200 खेपा टॅंकरच्या करून खेड्यापाड्यांतून पाणीपुरवठा चालू आहे. शहरात 13 टॅंकरनेच पाणी पुरवठा चालू असून, 21 प्रभागांत पिण्याचे पाणी पुरविले जात असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. या शिवाय खेड्या-पाड्यांतून शेतकऱ्यांच्या शेतावर नाला खोलीकरण, बांधबंदिस्त तसेच भुतवडा तलावातील गाळ काढण्यासाठी यंत्रसामुग्री पुरवून गाळ काढण्याची कामे सुरू आहेत.

लोकसभेच्या निमित्ताने रोहित पवार यांनी तालुका अक्षरशः पिंजून काढला असल्याने त्यांचा जनसंपर्क वाढला आहे. त्या मानाने आ. संग्राम जगताप तालुक्‍यात जास्त फिरकलेच नाहीत. मात्र रोहित पवार यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना एकत्र करून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी सफल प्रयत्न केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अपूर्ण साधनसामुग्री असूनसुद्धा कार्यकर्ते मोठ्या प्रयत्नाने लढत होते. यावेळी त्यांचे नेतृत्व रोहित पवारांकडे होते. या त्यांच्या प्रयत्नांचा परिणाम भाजपचे मताधिक्‍य घटण्यात झाले. पवार तालुक्‍यात फिरले नसते, तर मात्र नक्कीच खा. डॉ. विखे यांचे मताधिक्‍य वाढलेच असते, असे म्हणावे लागेल.

आज तालुक्‍यात विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. पवार या मतदारसंघात उभे राहतात की नाही, याची जनतेला मोठी उत्सुकता लागली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांचा पराभव झाल्याने, आता जामखेड कर्जत विधानसभा मतदारसंघात रोहित पवार धाडसच करणार नाहीत, अशी भाजपच्या गोटातून चर्चा रंगली आहे. पण मग पवार येथून निवडणूक लढवणार का? यापेक्षा कर्जत-जामखेड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे यांचे घटलेले मताधिक्‍य ही पालकमंत्री राम शिंदे यांच्यासाठी धोक्‍याची घंटा होऊ शकते; तर पवार व कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नेते एकवटून विधानसभेसाठी झगडले, तर या मतदारसंघात मोठी चुरस निर्माण होऊ शकते. आज ही पवार यांनी कर्जत-जामखेड तालुक्‍यात आपली सेवा चालूच ठेवली असून, तालुक्‍यातील जनतेला या दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठा, शेतीची कामे, तलावातील गाळ काढण्यासाठी मोठा आर्थिक व मानसिक आधार दिला आहे, हे नाकारून चालणार नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.