मुंबई – राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेली अकासा आणि जेट एअरवेज या दोन नागरी विमान वाहतूक कंपन्या नव्या वर्षात काम सुरू करणार आहे. त्याचबरोबर टाटांच्या अधिपत्याखाली एअर इंडिया कार्यरत होणार आहे. यामुळे देशातील वैमानीकांची आणि विमानातील कर्मचाऱ्यांची मागणी वाढली आहे.
सध्या भारतात 17 हजार वैमानिक असल्याचे समजले जाते. नव्या विमान कंपन्या मोठ्या ताकतीने बाजारात उतरत असल्यामुळे त्यांना अनुभवी वैमानिकांची गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या कार्यरत विमान कंपन्यांचे वैमानिक आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी अकासा आणि जेट एअरवेज प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
दोन वैमानिकाल शिवाय प्रत्येक विमानाच्या प्रत्येक दरवाजासाठी किमान एक कर्मचारी लागतो. बोईंग 737 मॅक्सला चार दरवाजे आहेत. अकासा कंपनीने 72 मॅक्स विमानाची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे या कंपनीला 288 पेक्षा जास्त विमान कर्मचारी लागणार आहेत. सेवेची सुरुवात किती विमानाने करणार हे अकासाने आणखी स्पष्ट केलेले नाही. अकासा व जेट एअरवेजला सर्व काम नव्या कर्मचाऱ्यांसह सुरू करता येणार नाही.
त्यांना काही अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे स्पाइस जेट आणि इंडिगो या कंपन्यांना आपले कर्मचारी इतरत्र जाणार नाहीत, यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. आमचे कर्मचारी इतर कोणत्याही कंपनीत जाणार नाहीत अशी आशा या दोन कंपन्यांनी व्यक्त केली आहे. वैमानिकाच्या मार्गदर्शकांना एक कोटी रुपयांपर्यंत पगार असतो. तर वैमानिकांना 80 हजार ते 6 लाख रुपयांपर्यंत पगार द्यावा लागतो.
स्पाइस जेट विमान कंपनी मॅक्स विमाने वापरते आणि अकासा कंपनी मॅक्स विमाने वापरणार आहे. त्यामुळे स्पाइस जेटचे कर्मचारी आकर्षित केले जाण्याची जास्त शक्यता आहे. भारतामध्ये नागरी विमान वाहतूक क्षेत्रात शिथिलीकरण झाल्यानंतर गेल्या 25 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विमानांची संख्या वाढली आहे. आता त्यात आणखी भर पडणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.