नगर -शहरात सुमारे 4 ते 5 हजार विडी कामगार असून, करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 21 मार्च पासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे विडी वळण्याचे काम पूर्णत: बंद झाले आहे. त्यामुळे तेव्हापासून त्यांना वेतन मिळालेले नाही. परिणामी विडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. विडी कपन्यांनी त्वरित सर्व विडी कामगारांचे प्रलंबित वेतन बॅंक खात्यांमध्ये जमा करावे, या मागणीचे निवेदन पद्मशाली युवा शक्ति व पद्मनादम ढोल-ताशा ध्वज पथकाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना दिले आहे.
पद्मशाली युवा शक्तीच्या सुमित इप्पलपेल्ली, शुभम बूरा, अनिकेत चव्हाण, आनंद येनगंदुल, ऋषी वाडेकर, गणेश दुर्गम, दीपक गुंडू, सागर बोगा, योगेश म्याकल आदींनी आ. संग्राम जगताप यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी आ.जगताप यांनी त्वरित कामगार मंत्री दिलीप वळसे यांना भ्रमनध्वनीवर संपर्क साधून विडी कामगारांच्या परिस्थीची माहिती देऊन त्यांना तातडीने सहकार्य करण्याची मागणी केली. लॉकडाऊन काळामध्ये काम बंद असले तरी संबंधित आस्थापनेच्या, कंपनीच्या मालकाने संबंधित कामगारांना वेतन अदा करणे सक्तीचे केले आहे. तथापि नगर शहरातील विडी कामगारांना संबंधित विडी कंपनींच्या मालकांनी लॉकडाऊनचा एक महिनाचा कालावधी उलटूनही कोणत्याही प्रकारे वेतन अदा केलेले नाही.