पिंपरी (प्रतिनिधी) – जुनी सांगवी येथील आयटी अभियंत्यांचा मृतदेह तब्बल 11 तासांनी महापालिकेने नेला. मात्र तो मृतदेह उचलण्यासाठी शेजारी राहणाऱ्या नागरिकांकडे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली. या घटनेमुळे सांगवी परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
शिंदेनगर, जुनी सांगवी परिसरात राहणाऱ्या संगणक अभियंत्याचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. याबाबत महापालिकेला कळवूनही तब्बल 11 तास मृतदेह पडून होता. महापालिकेने पोलिसांना मृतदेह उचलण्यास सांगितला. मात्र पोलिसांनी हे आमचे काम नाही, असे म्हणत मृतदेह उचलण्यास नकार दिला. सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास वायसीएम रुग्णालयाची रुग्णवाहिका शिंदेनगरमध्ये आली. त्यामध्ये फक्त एकच कर्मचारी होता. सकाळपासून मृतदेह घरातच असल्याने आसपासच्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. यामुळे शेजारी राहणारा एक नागरिक मृतदेह उचलण्यासाठी मदत करण्यास तयार झाला.
मदत करणाऱ्या शेजारील नागरिकाला पीपीई किट न देता फक्त हातमौजे आणि मास्क दिला. रुग्णवाहिकेसोबत आलेल्या कर्मचाऱ्याला मदत करीत तो व्यवस्थित बांधण्यात आला. मनपा कर्मचाऱ्याने मदत करणाऱ्या शेजाऱ्यालाच मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यास सांगितले. मात्र मयत व्यक्तीचे वजन जादा असून आपण एकटा ठेवू शकणार नसल्याचे शेजाऱ्याने सांगितले. मग मी मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यास मदत करतो मात्र त्यासाठी तुम्ही पैसे द्या, अशी मागणी मनपा कर्मचाऱ्याने केली.
आम्ही तुमची मदत करीत आहोत आणि तुम्ही आमच्याकडे पैसे का मागताय, असा सवाल शेजाऱ्याने केल्यावर मनपा कर्मचारी संतापला. आम्ही मृतदेह इथेच ठेवून जातो, अशी धमकी शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनीही शेजाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले. मात्र वस्तुस्थिती समजल्यावर पोलिसांनी मनपा कर्मचाऱ्यास कडक शब्दांत समज दिली. महापौरांच्या प्रभागात पैसे मागण्याच्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. 11 तासांनंतर रुग्णवाहिका पाठविल्यावर पैशाची मागणी केल्याने नागरिक संतापले.