पुणे – मंडई येथील मेट्रो स्थानकाच्या कामासाठी बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी महामेट्रोकडून पुणे महापालिकेच्या शनिपार येथील झाशीच्या राणी शाळेच्या इमारतीच्या जागेसह या शाळेशेजारील कवठे अड्डा या मिळकतीचीही मागणी केली आहे. या पूर्वीच महापालिकेने मेट्रोच्या बुधवार पेठ स्थानकासाठी सर्व शिक्षा अभियानाचे कार्यालय असलेली दादोजी कोंडदेव शाळा महामेट्रोला देण्यात आली आहे. या ठिकाणी भुयारी मेट्रोचे स्थानक होणार आहे.
महामेट्रोकडून मंडई येथे भूमीगत मेट्रोस्थानक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निश्चित केलेल्या जागेत दोन निवासी इमारती आहेत. मात्र, या इमारतींमधील नागरिकांनी शहरात इतरत्र पुनर्वसन न करता याच भागात पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्या भागात आवश्यक जागाच नाही. परिणामी महामेट्रोने या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेची शनिपार येथील झाशीच्या राणी शाळेची जागा तसेच त्या समोर असलेल्या कवठे अड्डा जागेची मागणी केली आहे. ही शाळा बंद असून कवठे अड्ड्याच्या ठिकाणी महापालिकेने बॅडमिंटन हॉल बांधलेला आहे.
मात्र, तो अद्याप बंदच आहे. त्यामुळे तातडीने या दोन्ही जागा मिळाव्यात, अशी मागणी पालिकेकडून करण्यात आली आहे. मात्र, या दोन्ही जागा मेट्रोच्या आराखड्याबाहेरच्या आहेत. तसेच, त्या विकास आराखड्यात शाळा तसेच क्रीडांगणांच्या आरक्षणासाठीच्या आहेत. त्यामुळे या जागांवरील आरक्षण रद्द करून त्या ठिकाणी निवासी इमारती बांधण्यास परवानगी द्यावी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेकडून अद्याप मेट्रोला जागा देण्याबाबत काहीच कळविलेले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.