दौंड येथे सराफाला लुटणारे चौघे 48 तासांत जेरबंद
पुणे – सराफी व्यावसायिकाला लुटणाऱ्या टोळीतील चौघांना गुन्हा घडल्यापासून 48 तासांच्या आत ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल साडेनऊ किलो सोन्यासह 3 कोटी 70 लाख 71 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. जप्त केलेल्या मालामध्ये 29 सोन्याची बिस्कीट्स, सोन्याच्या 3 मोठ्या पट्ट्या, 4 मोबाइल, 1 एअर गन आणि गुन्ह्यात वापरलेली इंडिगो कारचा समावेश आहे.
गणेश दगडू पवार (वय 27), अभिजित ऊर्फ बाळू दिलीप चव्हाण (वय 23, रा. महुद, ता. सांगोला, जि. सोलापूर), मोहसीन हमजेखान मुलाणी (वय 25) आणि प्रथमेश विजय भांबुरे (वय 26, दोघेही, रा. दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. अन्य एक जणावर गुन्हा दाखल आहे.
दि. 6 नोव्हेंबर रोजी फिर्यादी आणि त्यांचा साथीदार पहाटे 5.45 च्या सुमारास कोलकाता, मुंबईकडे चालले होते. ते दौंड रेल्वेच्या तिकीट घरासमोर उतरले. त्यावेळी नंबर नसलेल्या कारमध्ये त्यांना प्रवासी म्हणून नेण्यात आले. कुरकंभ, भिगवणमार्गे बांगरवाडी येथे प्रवासात त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज लांबवण्यात आला. त्यानुसार दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधीक्षक सचिन बारी यांनी तपासाचे आदेश दिले. त्यानुसार घनवट, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहायक फौजदार दयानंद लिमण, पोलीस हवालदार महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, मोरेश्वर इनामदार, राजू पुणेकर, मुकुंद अयाचित, पोलीस नाईक गुरू गायकवाड, सुभाष राऊत, प्रवीण मोरे, नितीन भोर, पोलीस शिपाई अक्षय जावळे यांचे पथक तपासासाठी नेमण्यात आले होते.
सांगोला तालुक्यातील महुद आणि आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील आरोपींनी हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी चौघांना जेरबंद केले. हा गुन्हा उघड आणल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी
35 हजारांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
“व्हॉट्स ऍप स्टेटस’ पाहून टाकला दरोडा
फिर्यादींना व्हॉट्स ऍपवर स्टेटस ठेवण्याची सवय होती. फिर्यादी नेहमी दौंड येथून सोने उतरून नेत असत. आरोपींना व्हॉट्स ऍप स्टेटसवरून फिर्यादींवर पाळत ठेवली. सोन्याचे बिस्कीट घेऊन जाताना “गुड बाय कौठळी’ असा स्टेटस व्हॉट्स ऍपवर ठेवला. त्यामुळे फिर्यादी सोने आणण्यास गेल्याचे आरोपींना कळले. त्यावरून त्यांनी हा दरोडा टाकला.