नवी दिल्ली – करोनाचा अतिसंसर्गशील असणारा डेल्टा विषाणू देशातील 174 जिल्ह्यात सापडला आहे. तर त्याची नवी आवृत्ती असणारा डेल्टा प्लस हा विषाणू 10 राज्यांतील 48 नमुन्यांमध्ये आढळला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने शुक्रवारी दिली.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल आणि मे महिन्यात पसरलेल्या दुसऱ्या लाटेला करोना विषाणूची डेल्टा आवृत्ती हीच कारणीभूत होती. मार्च महिन्यात तो 52 जिल्ह्यात आढळला. तर जून महिन्यात त्याचे अस्तित्व 174 जिल्ह्यात आढळले.
दरम्यान, देशातील 500 पेक्षा अधिक जिल्ह्यात सध्या बाधित दर पाच टक्क्यापेक्षा कमी असला तरी दुसरी लाट ओसरली आहे, असा समज करून घेऊ नये, असा इशारा भारतीय वैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. बलराम भार्गव यांनी दिला. ते म्हणाले, देशातील दुसरी लाट अद्याप ओसरली नाही.
सध्या देशातील 75 जिल्ह्यांत संसर्ग दर 10 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. हे जिल्हे महत्त्वाचे आहेत. आपल्याला तिसरी लाट टाळायची असेल तर व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिकदृष्ट्याही करोना योग्य वर्तणूक ठेवायला हवी. आपण सामूहिकपणे एकत्र येणे टाळायला हवे. कोणत्याही हॉटस्पॉटची शंका आली तर ते ओळखले पाहिजेत आणि ते विलगीकृत करायला हवेत, असे भार्गव म्हणाले.
डेल्टा प्लस ही विषाणूची आवृत्ती आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी चिंतेचे कारण म्हणून जाहीर केली आहे. ही आवृत्ती सापडतील त्या ठिकाणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहे. राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ. सुजितकुमार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 राज्यांत 48 नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस विषाणू आढळले आहेत. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक 20 त्यापाठोपाठ तामिळनाडू (9) आणि मध्य प्रदेश (7) यांचा समावेश आहे.
डॉ. सिंग म्हणाले, सध्या तरी डेल्टा आवृत्तीपेक्षा डेल्टा प्लस अधिक धोकादायक असल्याचे कोणतेही पुरावे आतापर्यंत तरी सापडले नाहीत. त्यांची सध्याची संसर्ग क्षमता डेल्टा सारखीच आहे. सध्या हे नमुने खूपच कमी असल्याने डेल्टा प्लस रोगप्रतिकारक शक्तीला चकवू शकतो, असे अनुमान काढता येणार नाही.
पुरावे आढळले नाहीत
डेल्टा विषाणू चिंतेचे कारण आहेत. त्यापुढील आवृत्ती असल्याने त्यावे नाव डेल्टा प्लस ठेवले आहे. हा प्लस म्हणजे हे विषाणू अधिक धोकादायक अथवा अधिक संसर्गशील आहे असा त्याचा अर्थ होत नाही. ज्यावेळी हा विषाणू अधिक धोकादायक असल्याचे समजेल त्यावेळी आम्ही ते जाहीर करी, असे डॉ. सुजीतकुमार सिंग यांनी स्पष्ट केले.