नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुस्तीपटूंनी पुकारलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरीही या प्रकरणी आरोपीविरोधात लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी कुस्तीपटूंनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणातील पुढील पाऊल म्हणून तक्ररादारांची चौकशी करण्यात येत असून दोन महिला कुस्तीपटूंना ५ जून रोजी नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीला उत्तर देण्याकरता एक दिवसाचा कालावधी देण्यात आला होता.
पोलिसांनी कुस्तीपटूंचीही चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्यांना ऑडियो, व्हिडीओ, आणि फोटो पुरावे म्हणून देण्यास सांगण्यात आले आहे, एक इंग्रजी वर्तमानपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. तसेच, एका महिला कुस्तीपटूला मारलेल्या मिठीचाही फोटो पोलिसांनी मागितला आहे.
दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, लैंगिक छळाच्या या घटना २०१६ ते २०१९ या काळात २१, अशोका रोड येथील WFI कार्यालयात आणि बृजभूषण सिंह यांच्या बंगल्यावर घडल्या आहेत. तसेच, काही घटना परदेशात स्पर्धांदरम्यान घडल्या आहेत. एका महिला कुस्तीपटूने परदेशात मोठे पदक जिंकल्यानंतर बृजभूषण सिंह यांनी तिला १० ते १५ सेकंद मिठी मारली होती. यावेळी बृजभूषण सिंह अधिक जवळ येऊ नयेत म्हणून संबंधित खेळाडूने तिच्या स्तनांवर हात ठेवला. या मिठीचा फोटो पोलिसांनी मागितला आहे.
घडलेल्या घटनांची तारीख, वेळ, कार्यालयात घालवलेला वेळ, रुममेट्सची माहिती पोलिसांनी कुस्तीपटूंकडून मागितली आहे. तसंच, परदेशात ज्यावेळी असा प्रकार घडला तेव्हाच्या साक्षीदारांची नावेही पोलिसांनी मागितली आहेत.
तक्रार दाखल केल्यानंतर बृजभूषण सिंह यांनी संबंधित तक्रारदाराला धमकी दिली होती, असाही आरोप सिंह यांच्यावर केला जात आहे . त्यामुळे या आरोपाची शहानिशा करण्याकरता धमकीचे पुरावेही पोलिसांनी मागितले आहेत. धमक्या देणाऱ्या कॉल्सशी संबंधित व्हिडीओ, फोटो, कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सअॅपची चॅट सादर करण्याची नोटीस पोलिसांनी संबंधित तक्रारदार महिला कुस्तीपटूला पाठवली आहे. नोटिसांवर कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे.