मुंबई – सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला एक महिन्याहून अधिक कालावधी होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. खऱ्या आयुष्याशी संबंधित या चित्रपटाची कथा अनेकांना आवडली आहे.म्हणूनच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 238 कोटींहून अधिक कमाई केली. त्यामुळे आता दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा पुढील चित्रपट कोणता असणार याची चर्चा सुरु झाली होती. आता सेन यांच्या पुढील चित्रपटाबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे.
‘द केरळ स्टोरी’चे यश पाहून आता सुदीप्तो सेन यांनी त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केली आहे.सेन यांनी आपल्या आगामी चित्रपटाची तयारी देखील सुरु केल्याचे समजते. या चित्रपटात भारतातील माओवादी चळवळीचा 50 वर्षांचा इतिहास समोर येणार आहे.याबाबत सुदिप्तो सेन म्हणतात, ‘माझा पुढचा चित्रपट भारतातील माओवादी चळवळीच्या पन्नास वर्षांवर आधारित आहे. ‘द केरळ स्टोरी’चे निर्माते विपुल शाह यांच्यासाठी मी हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.
द केरळ स्टोरी या चित्रपटाची निर्मिती विपुल शहा यांनी केली होती. आता ही जोडी पुन्हा एकदा काहीतरी हटके कॉन्सेप्ट घेऊन सर्वांसमोर येणार आहे. अद्याप या चित्रपटाच्या टायटलची घोषणा करण्यात आलेली नाही मात्र सेन यांनी आपण हा चित्रपट विपुल शहा यांच्यासोबत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
केरळ स्टोरीमध्ये ज्या प्रकारे धक्कादायक प्रकरणे दाखवत लव जिहाद सारख्या गोष्टींवर दिग्दर्शक सेन यांनी भाष्य केलं होते. अशा विषयाच्या चित्रपटामुळे मोठा वाद देखील झाल्याचे समोर आले होते. आता सेन यांनी माओवाद्यांच्या चळवळीवर चित्रपट काढण्याची घोषणा करून आणखी एका नव्या विषयाला हात घातला आहे. सेन हे शिवधनुष्य किती यशस्वीपणे पेलतात हे येणारा काळच ठरवेल.