नवी दिल्ली – श्रद्धा वालकर खून प्रकरणासारखी आणखी एक घटना दिल्लीत समोर आली आहे. पोलिसांना मुलीचा मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये सापडला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाची दिल्लीतील बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निक्की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र तिचा प्रियकर दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याच्या तयारीत होता. यावरून दोघांमध्ये पूर्वी वाद झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निक्कीने स्पष्टपणे सांगण्यात आले होते की, जर तिच्या जोडीदाराने दुसऱ्या महिलेशी लग्न केले तर ती त्याला अडकवेल. त्या दबावानंतरच आरोपीने निकीच्या हत्येचा कट रचला आणि त्यानंतर हा गुन्हा केल्याचे समजते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करण्याचे टाळले जात आहे.
आरोपीने सकाळी आपल्या प्रेयसीची हत्या केली आणि त्यानंतर त्याच संध्याकाळी घरच्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलीशी लग्न केले. चौकशीदरम्यान, आरोपी साहिलने स्वतः सांगितले की त्याने 10 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या आयएसबीटीजवळ एका कारमध्ये निकीचा गळा दाबून खून केला होता, तिची हत्या केल्यानंतर तो मृतदेहासोबत कारमध्ये फिरत राहिला, त्यानंतर त्याने ढाब्याच्या रेफ्रिजरेटरमध्ये तिचा मृतदेह ठेवला.
या संपूर्ण प्रकरणावर एडीसी विक्रम सिंह यांनी सांगितले की, त्यांना मंगळवारी सकाळी एका मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह ढाब्यात लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. तपासानंतर आरोपी साहिल गेहलोत याला अटक करण्यात आली आहे. आता पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
यापूर्वी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. श्रद्धाचा प्रियकर आफताब याने तिची दिल्लीतील मेहरौली येथे हत्या केल्याचा आरोप आहे. आफताबने गेल्या वर्षी 18 मे रोजी श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे करण्यात आले. मृतदेह ठेवण्यासाठी आफताबने फ्रीज विकत घेतला होता. यामध्ये त्याने मृतदेहाचे तुकडे ठेवले. तो रोज रात्री श्रद्धाच्या मृतदेहाचा तुकडा मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे. इतकंच नाही तर श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता, एवढेच नाही तर त्याच्या इतर मैत्रिणीही त्याला भेटायला या फ्लॅटमध्ये येत होत्या.