नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यंदा महापालिका ताब्यात घेण्याच्या ईर्ष्येने आम आदमी पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला असतानाच पक्षाच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवणारा प्रकार समोर आला आहे. महापालिका उमेदवारीसाठी पैसे मागितल्याप्रकरणी आपचे आमदार अखिलेशपती त्रिपाठी यांच्या एका नातलगासह तीन जणांना दिल्ली पोलिसांच्या लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपच्या कार्यकर्त्या शोभा खारी यांनी महापालिकेसाठी उमेदवारी मागितली होती. पक्षाचे तिकीट मिळवून देण्यासाठी त्रिपाठी यांच्या मेहुण्याने खारी यांच्याकडून 90 लाख रुपयांची मागणी केली.
ओम सिंह असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या दोन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पैसे घेण्यासाठी खारी यांच्या घरी आले असतानाच तिघा आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.
दरम्यान, या अटकेनंतर आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. शोभा खारी यांचे पती गोपाल खारी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आमदार त्रिपाठी यांना अगोदरच 35 लाख तर दुसरे आमदार राजेश गुप्ता यांना 20 लाख रुपये अगोदरच दिले आहेत.