मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सध्या मनी लॉंड्रिंग प्रकरणी शिक्षा भोगत आहेत. मात्र, त्यांचासमोरील अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाशिम कोर्टाने दिले आहेत.
यासंदर्भात एनसीबीचे मुंबई झोनलचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे. यावेळी कोर्टाने मलिक यांचा जामिन अर्जदेखील फेटाळला आहे. नबाव मलिक यांच्याविरोधात उद्या वाशिम शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे यांनी कारवाई करत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली. या प्रकरणावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले होते. या प्रकरणावरून नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंविरोधात अनेक गंभीर आरोप केले होते.
समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील जुने फोटो आणि पुरावे मलिक यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. यात वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचाही फोटो होता. तसेच मलिक यांनी वानखेडेंच्या जातीचे कागदपत्रंही समोर आणली, तसेच ती कागदपत्रे खोटी असल्याचे सांगत वानखेडेंनी या खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप केला होता.
यावरून वानखेडेंनी मलिक यांच्याविरोधात ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केलीय. ज्यानुसार कोर्टाने आता सीआरपीसीच्या कलम 156(3) नुसार या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.