Corona Third Wave | महाराष्ट्रापाठोपाठ ‘या’ राज्यानेही सुरु केली तिसऱ्या लाटेसाठी पूर्वतयारी; मुख्यमंत्री म्हणाले…

नवी दिल्ली ( Corona Third Wave ) – करोनाचे संकट टळले या अविर्भावात धार्मिक कार्यक्रम, लग्नसोहळे, राजकीय प्रचारसभा यांसाठी केलेली गर्दी देशाच्या चांगलीच अंगलट आली आहे. विषाणू संसर्गाच्या  दुसऱ्या लाटेमध्ये देशात दररोज विक्रमी रुग्ण आढळून येतायेत. यामुळे आरोग्यव्यवस्थांवर प्रचंड ताण आला असून ठिकठिकाणी हॉस्पिटल बेड्स, वैद्यकीय ऑक्सिजन, रेमडीसीवीर -सारखी औषधे यांचा प्रचंड तुटवडा जाणवतोय. दुसऱ्या लाटेशी सामना करताना देशाची दमछाक होत असतानाच आता तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे.

विषाणू संसर्गाची दुसरी लाट ( Corona Second Wave ) येण्याआधी मिळालेला काही महिन्यांचा अवधी दवडण्याची चूक तिसऱ्या लाटेपूर्वी ( Corona Third Wave ) तरी होणार नाही अशीच अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आज दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेल्या दिल्ली सरकारने एक शहाणपणाचा निर्णय घोषित केलाय. याबाबतची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली असून दिल्लीत आता तिसऱ्या लाटेसाठीची पूर्वतयारी सुरु करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी याबाबत बोलताना, “आम्ही राज्यातील ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवत आहोत. आपल्याला तिसऱ्या लाटेसाठी पूर्वतयारी करायलाच हवी. दुसऱ्या लाटेमध्ये दिल्लीत एका दिवसात सर्वाधिक २८ हजार रुग्ण नोंदवले गेले. सद्यस्थितीत आम्ही ज्या गतीने पायाभूत सुविधा उभारतो आहोत त्यानुसार तिसऱ्या लाटेत रोज ३० हजार रुग्ण नोंदवले तरी त्याचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज असू” असा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्रातही तिसऱ्या लाटेसाठी पूर्वतयारी ( Corona Third Wave In Maharashtra )

करोना संसर्गाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार केला जाणार असून तिसरी लाट येऊच नये यासाठी प्रयत्न करायला हवेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तर करोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. करोना बाधित आणि ऑक्‍सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्‍सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा. आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्‍सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमडेसिविर इंजेक्‍शन उपलब्धतेसाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहे, असेही पवार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.