नवी दिल्ली, दि. 10 – अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दिल्लीत श्री गुरू तेगबहादुर कोविड सेंटरला त्यांनी कोविडग्रस्तांच्या कार्यासाठी चालवलेल्या कामाला दोन कोटी रुपयांची देणगी दिली आहे. दिल्ली शीख गुरूद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे.
ही देणगी देतानाच शिखांच्या सेवाभावालाही अमिताभ बच्चन यांनी सलाम केला आहे, असेही सिरसा यांनी म्हटले आहे. या कोविड सेंटरमध्ये आता तीनशे खाटांचे रुग्णालयही सुरू करण्यात आले आहे. तेथील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अमिताभ बच्चन यांनी जवळपास रोजच फोन करून माहिती घेतली असेही त्यांनी कळवले आहे.
एवढेच नव्हे तर अमिताभ बच्चन यांनी विदेशातील आपले संबंध वापरून तेथून काही ऑक्सिजन सिलिंडर्स या केंद्रासाठी देण्याचीही व्यवस्था केली. दरम्यान, एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बोलताना अमिताभ बच्चन यांनी जागतिक समुदायाला भारताला मदत करण्याचे आवाहनही केले आहे.