नवी दिल्ली : दिल्लीतील आंबेडकर हॉस्पिटलमध्ये माफिया पैसे घेऊन परिचारकांना नोकऱ्या देत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांनी केला. चलनी नोटांचे बंडल विधानसभा सभागृहात फडकावत आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संबंधित माफियाने मी गप्प रहावे म्हणून पैसे देऊन मला खरेदी करण्याचा प्रयत्न केला असाही आरोप गोयल यांनी केला आहे. दरम्यान, गोयल यांनी एलजी व्हीके सक्सेना यांच्याकडेही हा मुद्दा उपस्थित केला आहे.
बॅगेत 15 लाखांच्या नोटांचे बंडल घेऊन गोयल विधानसभेत पोहोचले. भाषणादरम्यान त्यांनी बॅगेतून नोटा काढून टेबलावर ठेवल्या. त्यांनी हातात नोटांचे बंडल उचलले आणि म्हणाले, ‘हे टोकन मनी आहे, जे मला लाच म्हणून दिले होते. मुख्य सचिव आणि एलजी यांच्याकडे पैशासाठी नोकऱ्या देण्याचा मुद्दाही मी उपस्थित केला होता. मी त्यांना पत्र लिहिले. मी जीव धोक्यात घालून हे काम करत आहे. ते लोक इतके दबंग आहेत की माझ्याकडूनही चूक होऊ शकते. तुमचा आवाज उठवू नये म्हणून मला पैसे दिले होते. ज्यांनी मला लाच दिली ते माझ्यावरही हल्ला करू शकतात. मी जीव धोक्यात घालून हे काम करत आहे.
MCD-Lokpal Case : दिल्लीत लोकपालाच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती
गोयल यांचा आरोप आहे की, आंबेडकर रुग्णालय येथे ज्या लोकांना नियमानुसार नोकऱ्या द्यायला हव्यात, त्या दिल्या जात नाहीत. येथील नर्सिंग व इतर पदांसाठी चक्क निविदा काढण्यात आल्या आहेत. सरकारच्या नियमानुसार 80 टक्के भरती जुन्या कर्मचाऱ्यांची असायला हवी, पण तसे होताना दिसत नाही. काम मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून कंत्राटदार आपला हिस्सा घेतात. माफिया व कंत्राटदार सेटींगच्या माध्यमातून पैसे घेऊन कामे देत आहेत. ठिकठिकाणी तक्रारी केल्या, पण कारवाई झाली नाही.