दोन महिन्यांत चौकशीअंती कारवाई होणार; नाराज आमदारांनी समिती समोर मांडले म्हणणे
नगर – जिल्ह्यातील पराभूत आमदारांनी आपले म्हणणे कोअर कमिटीसमोर मांडले असून माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे. या संदर्भातील चौकशी येत्या दोन महिन्यात होऊन चौकशीच्या अहवालानुसार कारवाई होणार आहे. सर्वांनी आपले म्हणणे मांडले असले तरी नाराजांची नाराजी कायम असल्याचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यासाठी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक शासकीय विश्रामगृहावर पार पडली. त्यानंतर कर्डिले पत्रकारांशी बोलत होते. कर्डिले म्हणाले की, आमचा निवडणुकीमध्ये पराभव कसा झाला व कोणामुळे झाला हे सर्व मुद्दे मुंबईत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मांडलेले आहे.
निवडणुकीच्या काळात मतदारांमध्ये जाऊन सर्व्हे केला जातो, तसेच चौकशी करताना प्रत्यक्ष मतदार संघात जाऊन मतदारांची मते जाणून घेऊन मगच कारवाई करावी, असा मुद्दाही नाराज आमदारांनी या वेळी मांडलेला आहे, असे कर्डिले यांनी सांगितले. या वेळी राधाकृष्ण विखेही उपस्थित होते. या संदर्भात दोन्ही बाजूचे म्हणणे विरोधी पक्ष नेत्यांनी ऐकूण घेतलेले असून त्यावर येत्या दोन महिन्यात चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे.
विखे पॅटर्न राबवून भाजपाचा अध्यक्ष करा
कॉंग्रेस पक्षाने सत्यजित तांबे यांना अध्यक्ष करावे, असा पक्षाने आदेश दिला होता. तो आदेश डावलून विखे यांनी अध्यक्षपद आपल्याकडे घेतले होते. त्यावेळी त्यांनी इतर पक्षांमधील सदस्य आपल्या बाजूने घेऊन मतदान घडवून आणले होते. तसाच पॅटर्न आता या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राबवून भाजपाचा अध्यक्ष करण्यासाठी राबवावा,अशी अपेक्षा या वेळी कर्डिले यांनी व्यक्त केली.