नवी दिल्ली – शीख धर्माचे आदराचे स्थान असलेल्या करतारपूर गुरुद्वारा पुढील महिन्यात उघडणार आहे. येत्या 22 सप्टेंबर ही शीख संप्रदायाचे संस्थापक गुरु नानक देव यांची पुण्यतिथी आहे. करतारपूर तीर्थक्षेत्र खुले करण्याचा निर्णय नॅशनल कमांड अॅण्ड ऑपरेशन सेंटरने शनिवारी घेतला आहे.
पुढील महिन्यापासून पाकिस्तान कोरोनाव्हायरस लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या यात्रेकरूंना गुरुद्वारा दरबार साहिब करतारपूरला भेट देण्यास परवानगी देणार आहे, दरबार साहिबमध्ये जास्तीत जास्त 300 लोकांना एकत्र येण्याची परवानगी असणार आहे.
डॉन वृत्तपत्राच्या बातमीनुसार, एनसीओसीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, कोविड -19 पासून प्रतिबंध करण्याच्या नियमांचे पालन करून, शीख यात्रेकरूंना पुढील महिन्यापासून करतारपूरला जाण्याची परवानगी दिली जाईल.
उल्लेखनीय म्हणजे, कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे भारताला 22 मे ते 12 ऑगस्ट दरम्यान ‘क’ वर्गात ठेवण्यात आले होते आणि तेथून येणाऱ्या लोकांना विशेष मंजुरीची आवश्यकता होती.
लोकांना लसीच्या दोन्ही डोसचे प्रमाणपत्र आणि गेल्या 72 तासांत केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल दाखवून पाकिस्तानात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, विमानतळांवर अँटीजेन चाचणी करण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे.