पिंपरी – बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहनावरील कर्जाचा बोजा उतरवून बॅंकेची व शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 डिसेंबर 2017 ते 10 सप्टेंबर 2018 या कालावधीत पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात घडला.
प्रदीप पांडुरंग साळुंखे, सत्यवान नीलकंठ मसाडे (दोघे रा. राजगुरुनगर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुखदेव काळूराम लिंभोरे (वय 47, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींनी आयसीआयसीआय बॅंकेकडून 20 लाख 15 हजार 700 रुपये वाहन कर्ज घेतले होते. त्याचा हप्ता दरमहा 53 हजार 700 रुपये इतका होता. आरोपी प्रदीप याने कर्जातील दोन लाख आठ हजार 377 रुपये आणि आरोपी सत्यवान याने 68 हजार 451 रुपयांचे कर्ज फेडले. त्यानंतर आरोपींनी बॅंकेची बनावट कागदपत्र व शिक्क्याद्वारे बनावट ना हरकत प्रमाणपत्र आरटीओ कार्यालयात सादर करून कर्ज बोजा उतरविला.