देहूतील “पाणीबाणी’ संपली!

सहाव्या दिवशी पाणीपुरवठा सुरळीत : आंद्रा धरणातून इंद्रायणीत सोडले पाणी

“एटीएम’ला पाच दिवसांची सुगी…

गेल्या पाच दिवसांपासून पाणीच नसल्याने ग्रामस्थांचे “पाणीबाणी’त हाल झाले. या स्थितीमध्ये देहूतील खासगी टॅंकरची मागणी वाढली आहे. गावात खासगी स्वरुपात असणारे ऑल टाइम वॉटर (पाण्याचे एटीएम) आहेत. या एटीएमवर पाच रुपयांत 20 लीटर पाणी मिळते. मात्र या एटीएम चालकांनी व्यवसाय करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीची ना-हरकत प्रमाणपत्र, येथील पाणी प्रमाणित शुद्धीकरण आहे किंवा नाही, त्यांची ग्रामपंचायतीमध्ये नोंदी आहेत का ? याबाबत निश्‍चित माहिती मिळू शकली नाही. हे जरी असले तरी याच “एटीएम’द्वारे देहूकरांची पाच दिवस तहान भागविली जात असल्याने पाणी पुरविणाऱ्या या एटीएम व्यवसायाला सुगीचे दिवस आल्याचे स्पष्ट झाले.

देहुरोड – सहा दिवस देहूकरांच्या घशाला कोरड पडली, अखेर पाटबंधारे विभागाकडून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सहाव्या दिवशी देहुकरांना पाणी मिळाले. पाटबंधारे विभागाकडून आंध्रा धरणातून तीर्थक्षेत्र देहूत बंद पाणी पुरवठा सुरू करण्याचे आदेशानंतर नदी पात्रातील संपलेले पाणी सोमवारी (दि. 6) आले. सध्या पाणी मिळाले असले तरी हे किती काळ टिकेल याबाबत ग्रामस्थांमध्ये साशंकता आहे.

तीर्थक्षेत्र देहूगावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलउपसा केंद्राजवळील बंधाऱ्यातून पाणी गळती होते. या गळतीमुळे नदी पात्रातील पाणी लवकर संपले. तर दुसरीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने देहू येथील पाणी योजना तोट्यात आणि थकबाकी वसुली होत नसल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे सुमारे दीड वर्षांपासून ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजना हस्तांतरित करून घ्यावी म्हणून 19 वेळा पत्र पाठविले. ग्रामपंचायतीने अपूर्ण योजना पूर्ण करून देण्याबाबत वारंवार पत्रव्यव्हाराकडे गांभिर्याने पाहिले नाही. खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे यांच्या प्रयत्नाने तीन-चार वेळा मुदत वाढ मिळण्यात यश आले, मात्र ते अल्पायुषी ठरले.

अखेर ऐन उन्हाळ्यात निवडणुकीनंतर आणि नदी पात्र कोरडे पडल्यावर पुन्हा योजना बंद झाली. पुन्हा महिनाभराची मुदतीने पाणी सुरू करण्याचे वरिष्ठांनी आदेश काढले. मात्र नदी पात्रात पाण्याचा थेंबही नाही. पाटबंधारे विभागाने संथ गतीने आणि उशीराने सोडलेले पाणी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने 1 मेपासून बंद केलेला पाणीपुरवठा यामुळे देहूकरांच्या घशाची कोरड पाचव्या दिवशीही कायम होती.

पाटबंधारे विभागाकडून सोडण्यात आलेले पाणी सहाव्या दिवशी पात्रात आले आणि पाणी पुरवठा सुरू झाल्यावर देहूकरांचे घसा “ओला’ झाला. मात्र हा खंडित पाणी पुरवठा किती दिवस राहणार याबाबत नागरिकही साशंक आहेत. पाणीप्रश्‍न नेहमी भेडसावतो, त्यावर कायमस्वरुपी तोडगा होणार का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या बंधाऱ्याची गळती तातडीने थांबविण्यात यावी यासाठी सांगुर्डी ग्रामस्थांनी शनिवारी (दि. 4) स्वत:च्या शेताला पाणी पुरवठा बंद करून बंधाऱ्याची गळती थांबविण्यासाठी सहकार्य केले. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे बंधाऱ्याची गळती काढणे शक्‍य झाले नाही. जुजबी स्वरूपात पाणी गळती थांबविण्यासाठी खडी, वाळू मिश्रीत पोती टाकल्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण तात्पुरता कमी झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.