भिंत कोसळल्याची पालिकाही करणार चौकशी

त्रिसदस्यीय समिती नेमणार : नुकसान भरपाई देण्याची मागणी

पिंपरी – कासारवाडी येथे खोदकाम करताना यशवंत प्राईड या इमारतीची अचानक सिमा भिंत कोसळून लोकेश ठाकूर हा मुलगा गंभीर जखमी झाला व नंतर त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. याच दुर्घटनेमध्ये इतर दोन मजूर जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष पाटील यांनी दिले आहेत.

सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे आणि प्रभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्‍त आशा राऊत ही त्रिसदस्यीय समिती या घटनेची चौकशी करणार आहे.

जवळकर वस्तीमधील यशवंत प्राईड वसाहतीमध्ये ड्रेनेजचे काम सुरू होते. येथे खोदकाम सुरू असताना सुरक्षा भिंत कोसळली. यावेळी भिंतीच्या शेजारी लहान मुले खेळत होती. कोसळलेल्या भिंतीच्या राडारोड्यात लोकेश अडकल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे. याची गंभीर दखल घेत या घटनेची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
या दुर्घटनेमध्ये महापालिकेचा ठेकेदार व महापालिकेचे अधिकारी दोषी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. हे काम करीत असताना कुठल्याही प्रकारची सुरक्षितेची साधने वापरण्यात आली नव्हती. बॅरिकेडस्‌ लावण्यात आले नव्हते. त्यामुळे या चिमुरड्याचा मृत्यू झालेला आहे. व दोन गरीब मजूर जखमी झालेले आहेत. या दुर्घटनेसाठी संबंधित ठेकेदार व महापालिका अधिकारी यांची जबाबदारी निश्‍चित करुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच जखमींना व मृत्यू पडलेल्या मुलास महापालिकेच्या वतीने योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी साने यांनी महापालिका आयुक्‍तांकडे केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.