वर्धा – राज्यात ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील मृत महिलेला करोना असल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर करोना पॉझिटिव्ह मृत महिलेच्या संपर्कात असणाऱ्या 141 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच हिवरा तांडा परिसरात सात किलो मीटर अंतरापर्यंतची सर्व गावे सील करण्यात आली आहेत.
या मृत महिलेच्या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या 141 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर 28 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर जिल्हा प्रशासनाने कंटेन्मेंट झोन तयार करत गावात घरोघरी आरोग्य तपासणी करण्याची मोहीम सुरु केली. या परिसरात तीन किलो मीटर अंतरावर असणाऱ्या कंटेन्मेंट झोन मधील हिवरा तांडा, हिवरा, जामखुटा, राजनी, हराशीं, बेल्लार, दहेगाव मुस्तफा, बोथली किन्हाळा, बेल्लारा तांडा, पाचोड आदी गावातील 8 हजार 05 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
बफर झोनमध्ये येणाऱ्या 7 किलो मीटर अंतरावरील वाढोना, बेडोना, चिंचोली डांगे, येथील 5 हजार 269 नागरिकांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे. या परिसरात फिवर क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्य तपासणीच्या कामात शिक्षक, आरोग्य सेवक, आशा, आरोग्य सेविका, आशा वर्कर अशी यंत्रणा कामात लागली आहे.