सोरतापवाडी (वार्ताहर) – पुण्यातील भवानी पेठेतून ऊरुळी कांचन येथे पाहुण्याला भेटायला आलेल्या व्यक्तीचा उपचाराचा दरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर ती व्यक्ती करोना बाधित असल्याचे समजले.
उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचेता कदम यांनी सांगितले की, शुक्रवारी ती व्यक्ती (वय 50) पुण्यातून उरुळी कांचन येथील नातेवाइकांकडे आली होती. पुण्याहून आलेली व्यक्ती घराच्या बाहेर खोकत असल्याचे शेजारांच्या लक्षात येताच ही बाब त्यांच्या पाहुण्यांना सांगितली, त्यांनी ताबडतोब त्यांना पुण्याला सोडले. त्यांना त्रास जाणवू लागल्याने रविवारी त्यांना पुण्यात हॉस्पिटलमध्ये भरती केले.
उपचार सुरू असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान ती व्यक्ती करोनाबाधित असल्याचे समजले. संपर्कातील सतरा जणांना पुढील तपासणीसाठी पुण्यात पाठविले जाणार असल्याची माहिती डॉ. कदम यांनी दिली.