वर्धा – वर्धा शहरातील मध्यवस्तीत असलेल्या मुथ्थुट फायनान्सवर दिवसाढवळ्या चौघांनी बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकला. यात अडीच किलो सोने, 3 लाख 28 हजार रुपयांची रोख लंपास झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून चौकशीसाठी फायनान्स मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हा प्रकार आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडला. हॉटेल रामाकृष्णाच्या जवळ असलेल्या मुथ्युट फायनान्समध्ये सकाळी 9 वाजेच्या सुमारास कुरिअर बॉय असल्याचे सांगून तिघे जण घुसले. त्यांच्या हातात बॅंकेतील तीन कर्मचाऱ्यांच्या नावाने असलेले लिफाफे होते.
काही वेळात बॅंकेतील तीन कर्मचाऱ्यांना बंदूक आणि चाकू दाखवत बॅंकेतील रोखपालाच्या लोखंडी कठड्यात बंद करून बॅंकेत ग्राहकांचे जमा असलेले जवळपास अडीच किलो सोने आणि 3 लाख 28 हजार रुपये रोख घेउन पोबारा केला. अवघ्या अर्धा तासात दरोडेखोरांनी गजबजलेल्या भागात दरोडा टाकल्याने पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला.
घटनास्थळावर पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांसह पोलिसांचा ताफा दाखल होऊन कारवाईला सुरुवात केली, फिंगर प्रिंट आणि स्केचसाठी पोलीस कामाला लागले. शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची चमू अमरावती आणि यवतमाळ येथे दाखल झाली असून आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
तसेच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत बॅंकेच्या मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना तपासासाठी ताब्यात घेतले आहे. लवकरच आरोपी माध्यमांसमोर हजर केले जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी दिली.